मुंबई : गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी सचिन वाझे (Sachin Vaze) यांना दर महिन्याला 100 कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिले होते, असा गंभीर आरोप केला आहे. यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केली असून पोलीस बदल्यांबाबत त्यांच्यासह भाजपा नेत्यांनी राज्यपालांची सुद्धा भेट घेतली. मात्र, यावरून काँग्रेसकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. (congress leaders nana patole criticized opposition leader devendra fadnavis)
वसुली कशी करतात? वसुलीतील वाटा किती असतो? आणि त्याचे वाटप कसे केले जाते? याचा दांडगा अनुभव विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना असून ते त्यांचा अनुभव कथन करत आहेत. पाच वर्ष सत्तेत असताना मंत्रालयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते सर्व विभागात कसे घुसवले होते, ते किती वसुली करत होते व त्यातला किती वाटा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जात होता, याची चौकशी करण्याची मागणी आपण आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून करणार आहोत, असे सडेतोड उत्तर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहे.
प्रसार माध्यमांशी बोलताना नाना पटोले यांनी पोलीस बदल्यांवरून देवेंद्र फडणवीस यांनी आज केलेल्या आरोपाचा खरपूस समाचार घेतला. फडणवीस यांनी सत्तेत असताना रश्मी शुक्लासारख्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून कोणाला किती वाटा द्यायचा याचा मोठा अनुभव मिळवलेला आहे. भाजपाने आयएएस आयपीएस अधिकाऱ्यांवर केंद्र सरकारचा दबाव आणून सत्तेचा गैरवापर केला. या अधिकाऱ्यांनी कोणाच्या हातचे बाहुले बनून काम करू नये. महाराष्ट्र विकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम भाजपा करत आहे परंतु महाराष्ट्राची जनता त्यांचा हा खेळ ओळखून आहे. फडणवीस हे स्वतःच जज असल्याच्या भूमिकेत वावरत आहेत. सरकारला बदनाम करण्यासाठी कधी अधिकारी तर कधी राजभवनच्या माध्यमातून भाजपाचे हे उद्योग सुरु आहेत, असे नाना पटोले यांनी सांगितले.
माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर कालपर्यंत हेच भाजपावाले टीका करत होते, आता ते त्यांचे प्रिय कसे झाले? ते कोणाच्या इशाऱ्यावर काम करत आहेत याची आम्हाला माहिती आहे. खा. मोहन डेलकर यांनी मुंबईत आत्महत्या केली त्याचा एफआयआर दाखल करण्यातही परमबीर सिंग यांनी टाळाटाळ केली. त्यांची भूमिका संशयास्पद राहिली आहे. सध्या सुरु असलेल्या प्रकरणाची हायकोर्टाचे न्यायाधीश किंवा निवृत्त न्यायाधीशांकडून चौकशी करावी, अशी काँग्रेसची मागणी आहे. मी सरकारमध्ये असतो तर परमबीर सिंग यांनी केलेल्या वर्तणुकीनंतर त्यांची बदली केली नसती तर थेट निलंबित केले असते, असे नाना पटोले म्हणाले.
मूळ मुद्दा हा मुकेश अंबानी यांच्या घरासमोर जिलेटीनच्या कांड्या ठेवलेल्या गाडीचा होता. या जेलिटीनच्या कांड्या कुठून आल्या याचा तपास सुरु असताना हिरेन मृत्यू प्रकरण आले. या प्रकरणाचा एटीएस उत्तम रितीने तपास करत असताना भाजपाने एनआयएकडे तपास देण्याची मागणी केली. आता त्याला आणखी फाटे फोडले जात आहेत. वास्तविक पाहता जनता महागाईने होरपळून निघत आहे. शेतकरी आंदोलनावर ११० दिवसांनंतरही मोदी सरकार निर्णय घेत नाही, बेरोजगारी प्रचंड वाढली आहे. या मूळ समस्यांवरून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी भाजपाचा हा सर्व खटाटोप चालला आहे, असेही नाना पटोले म्हणाले.