नवी दिल्ली: काँग्रेस कार्यकारणीच्या बैठकीला सुरुवात झाली आहे. गेल्या दोन निवडणुकांमध्ये पक्षाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राहुल गांधींनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर सोनिया गांधींनी अंतरिम अध्यक्ष म्हणून पक्षाची धुरा सांभाळली. मात्र त्यांचा वर्षभराचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. त्यामुळे काँग्रेसची सूत्रं नेमकी कोणाकडे जाणार, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.काँग्रेसच्या देशभरातल्या २३ महत्त्वाच्या नेत्यांनी अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधींना पत्र लिहिलं. पक्षाला पूर्णवेळ आणि प्रभावी अध्यक्ष हवा, अशी मागणी या नेत्यांनी पत्रात केली. एका बाजूला २३ नेते पूर्णवेळ आणि प्रभावी अध्यक्ष द्या, अशी मागणी करत असताना दुसऱ्या बाजूला अनेक मुख्यमंत्र्यांसह दिग्गज नेत्यांनी सोनिया आणि राहुल गांधींच्या नेतृत्त्वावर पूर्ण विश्वास व्यक्त केला. मात्र राहुल गांधी पक्षाध्यक्षपद स्वीकारण्यास तयार नसल्याचं वृत्त 'इंडिया टुडे'नं सुत्रांच्या हवाल्यानं दिलं आहे.आपण अध्यक्षपद स्वीकारण्यास उत्सुक नाही. त्याऐवजी गांधी कुटुंबाबाहेरील एखाद्या व्यक्तीकडे अध्यक्षपद सोपवण्यात यावं, असं राहुल यांचं मत आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनिया यांचा कार्यकाळ संपल्यानं त्यांच्याऐवजी डॉ. मनमोहन सिंग किंवा ए. के. अँटनी यांच्याकडे पक्षाची धुरा सोपवण्यात येईल. त्यांच्याकडे सोनिया यांच्याप्रमाणेच अंतरिम अध्यक्षपद दिलं जाईल. कोरोना संकट संपल्यानंतर पक्षाचं अधिवेशन होईल आणि राहुल यांच्याकडे पक्षाध्यक्षपद दिलं जाईल.
सोनिया गांधी पायउतार झाल्यानंतर पुढे काय?; अध्यक्ष पदासाठी काँग्रेसचा प्लान तयार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2020 11:55 AM