नवी दिल्ली – काँग्रेस पक्षातील अंतर्गत मतभेदाच्या काळात एप्रिलमध्ये अध्यक्षपदासाठी संघटनात्मक निवडणूक घेण्याचा विचार सुरु आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर अनेक स्थानिक, राज्य निवडणुकीत काँग्रेसला यशस्वी कामगिरी करता आली नाही, त्यामुळे काँग्रेस अध्यक्षपदासाठी होणारी निवडणूक महत्त्वाची ठरणार आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार जर राहुल गांधी निवडणूक लढण्यास तयार नसतील तर प्रियंका गांधी यांना मैदानात उतरवलं जाऊ शकतं. हायकमांड संघटनात्मक निवडणुकीच्या विविध पर्यायावर विचार करत आहे. राहुल गांधी यांनी अद्यापही अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आहेत की नाही याबाबत नेत्यांना कोणतेही संकेत दिले नाहीत. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा सोपवला होता. त्यानंतर सोनिया गांधी यांना काँग्रेसचं अंतरिम अध्यक्ष बनवलं होतं.
काँग्रेस अध्यक्षपदासाठी राहुल गांधी इच्छुक नसतील तर त्यांची बहिण प्रियंका गांधी वाड्रा या अध्यक्षपदासाठी संभाव्य उमेदवार असतील. गांधी घराण्याशिवाय कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेतेही उमेदवारीसाठी तयार होऊ शकतात. जर असं झालं तर काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक रंजक होईल. मात्र याचा विपरित परिणाम होईल असे पक्षातील काही जणांचे मत आहे.
एआयसीसीचे पदाधिकारी आणि राहुल यांचे निकटवर्तीय म्हणाले, "कॉंग्रेसला एकमेव पर्याय म्हणजे पक्षाला स्थिर करणे आणि नंतर कोणत्याही प्रकारच्या पुनर्बांधणीसाठी तत्पर राहणे, जेणेकरून गांधी कुटुंबातील एखादा सदस्य पदभार स्वीकारण्यास तयार होऊ शकेल, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आसामसारख्या प्रमुख राज्यांच्या आगामी निवडणुकांनंतर कॉंग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक होण्याची शक्यता आहे. आसाममध्ये सत्ताधारी भाजपाला आव्हान देणारा कॉंग्रेस हा मुख्य प्रतिस्पर्धी आहे तर तामिळनाडूमध्ये द्रमुकबरोबर विरोधी पक्षात आहे.
त्याच वेळी, पश्चिम बंगालमधील डाव्या पक्षांशी कॉंग्रेस हातमिळवणी करू शकते, तिथे सत्ताधारी टीएमसी आणि भाजपा राज्यात सरकार स्थापनेसाठी मुख्य दावेदार असतील. पश्चिम बंगालमधील निवडणुका देखील महत्त्वाच्या ठरल्या आहेत कारण प्रथमच भाजपाने जिंकण्यासाठी अनेक डाव आखले आहेत. हे पाहता कॉंग्रेससमोर आव्हान वाढलं आहे. त्यामुळे काँग्रेस अध्यक्षपदी कोण विराजमान होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.