भिवंडी लोकसभा मतदार संघात काँग्रेसचे प्राबल्य वाढण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2021 03:09 PM2021-05-31T15:09:41+5:302021-05-31T15:38:22+5:30
Bhiwandi Lok Sabha constituency Politics: भाजपकडे असलेली भिवंडी लोकसभा खेचण्यासाठी सुरेश म्हात्रे यांना आपल्या गोटात घेण्यासाठी काँग्रेसनेत्यांच्या हालचाली देखील वाढल्या असून सुरेश म्हात्रे नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
भिवंडी - शिवसेनेचे माजी जिल्हा संपर्क प्रमुख तसेच जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम समितीचे सभापती सुरेश म्हात्रे उर्फ बाळया मामा यांनी दोन दिवसांपूर्वी शिवसेनेच्या पक्ष सदस्य पदाबरोबरच आपला ठाणे जिल्हा परिषद सदस्यत्वाचा देखील राजीनामा सेनेचे जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील यांच्याकडे दिला आहे. बाळ्या मामा यांच्या राजीनाम्यानंतर ते काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. दरम्यान आपल्या पक्ष प्रवेशा बाबत सुरेश म्हात्रे यांनी अधिकृतपणे आपली भूमिका जाहीर केलेली नसली तरी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बाळ्या मामा यांनी आपला राजीनामा दिला असल्याने त्यांच्या काँग्रेस पक्ष प्रवेशाची चर्चा जिल्ह्यात रंगू लागली आहे.
भाजपचे खासदार कपिल पाटील यांचे कट्टर राजकीय शत्रू म्हणून बाळ्या मामा जिल्ह्याच्या राजकारणात प्रसिद्ध आहेत. शिवसेनेत असतांनाही बाळ्या मामा यांनी २०१९ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत खासदार कपिल पाटील यांच्या विरोधात जाहीर बंड पुकारले होते. त्यामुळे सेना भाजप युतीच्या विरोधात काम केल्यामुळे सेना पक्षश्रेष्ठींनी बाळ्या मामा यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई केली होती. त्यावेळी कारवाई झाली तरी बेहत्तर मात्र कपिल पाटील यांना निवडणुकीत मदत करणार नाही अशी भूमिका सुरेश म्हात्रे यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केली होती. मात्र २०१९ साली काँग्रेसचे लोकसभा उमेदवार सुरेश टावरे यांना बाळ्या मामा यांच्या राजकीय मदतीचा फायदा घेता आला नाही आणि त्यामुळे काँग्रेसला भिवंडी लोकसभा मतदार संघावर पाणी फेरावे लागले.
भिवंडी लोकसभा मतदार संघात मुस्लिम मतदार जास्त असून या मतदारांचा काँग्रेसपक्षाच्या उमेदवाराकडे मतदान करण्याचा कल जास्त असतो, त्यातच भिवंडी ग्रामीण भागात बाळ्या मामा यांना माननारा वर्ग मोठ्या प्रमाणात असून भिवंडी लोकसभेत असलेल्या भिवंडी , शहापूर , मुरबाड , कल्याण या मतदार संघात म्हात्रे यांचा आजही चांगला दबदबा व दरारा आहे. शहरातील मुस्लिम मतदार व ग्रामीण भागात असलेला बाळ्या मामा यांचा चाहता वर्ग या सर्वांचाच फायदा सुरेश म्हात्रे काँग्रेसमध्ये गेल्यास काँग्रेस पक्षाला होणार आहे. विशेष म्हणजे काँग्रेसनेते देखील या बाबत सकारात्मक असून सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांना काँग्रेस पक्षात घेण्यास उत्सुक झाले असून काँग्रेसचे राज्यातील दिग्गज नेते सध्या बाळ्या मामा यांच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. एकंदरीत सुरेश म्हात्रे यांच्या काँग्रेसपक्ष प्रवेशाने काँग्रेसला नवसंजीवनी मिळणार असल्याचे मत राजकीय जाणकार व्यक्त करीत असून भाजपकडे असलेली भिवंडी लोकसभा खेचण्यासाठी सुरेश म्हात्रे यांना आपल्या गोटात घेण्यासाठी काँग्रेसनेत्यांच्या हालचाली देखील वाढल्या असून सुरेश म्हात्रे नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणे गरजेचे ठरणार आहे.