मुंबई – राजस्थानमधील पक्षांतर्गत संघर्षामुळे काँग्रेसने आता पक्षाच्या विरोधात कारवाया करणाऱ्या नेत्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. काँग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम यांना काँग्रेस बाहेरचा रस्ता दाखवू शकते. त्यांच्यावर पक्षविरोधी कारवाया आणि शिस्तभंगाच्या आरोप ठेवण्यात आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार मुंबई काँग्रेस अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी हायकमांडकडे याबाबत रिपोर्ट सादर करुन संजय निरुपम यांची हकालपट्टी करण्याची शिफारस केली आहे. अलीकडेच काँग्रेसने प्रवक्ते संजय झा यांना निलंबित केले होते.
काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते म्हणाले की, सचिन पायलट यांच्या प्रकारानंतर आता ऑल इंडिया काँग्रेस कमिटीने पक्षविरोधी कारवाया आणि पक्षाची शिस्तभंग करणाऱ्या नेत्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. ट्विट करणारे काही नेते एआयसीसीच्या रडारवर आहेत. तर संजय निरुपम यांनी माझं कोणतंही विधान अथवा ट्विट कोणत्याही प्रकारे पक्षविरोधी कारवायांचा भाग आहे असं मला वाटत नाही असं सांगितले आहे.
याबाबत टाइम्स ऑफ इंडिया या इंग्रजी दैनिकाशी बोलताना संजय निरुपम म्हणाले की, राज्यात महाविकास आघाडी बनवण्याची गरज नव्हती असं पहिल्या दिवसापासून माझं स्पष्ट मत आहे. आताही सरकारमध्ये काँग्रेसची कोणतीही भूमिका नाही, सर्व काम शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस मिळून करत आहे. मागील ६ महिन्यापासून मुंबईत काँग्रेस पक्षाचं अस्तित्व नाही, संपूर्ण पक्ष क्वारंटाईन झाला आहे असा आरोप त्यांनी केला.
तसेच गेल्या वर्षी झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतही निरुपम यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या विरोधात मोर्चेबांधणी केली होती. ते म्हणाले होते की, कॉंग्रेसमध्ये दोन गट आहेत, त्यातील एक सोनिया गांधी आणि दुसरे राहुल गांधी यांच्या नेतृत्वात आहेत. सोनियाचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांनाही त्यांनी लक्ष्य केले होते.
निरुपम यांनी राज्यात कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या बाजूने प्रचार न करण्याची घोषणा केली होती. त्याचबरोबर ते राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या युतीमध्ये सरकार स्थापण्याच्या बाजूने नव्हते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री बंगल्याजवळील मालमत्ता खरेदीची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. यावर शिवसेनेने महाराष्ट्र कॉंग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासमवेत तीव्र निषेध नोंदविला होता. अलीकडेच सचिन पायलटच्या बाबतीतही संजय निरुपम यांनी त्यांना रोखण्याचं आवाहन केलं होतं. निरुपम म्हणाले होते की, जर सर्व लोक एकेक करून निघून गेले तर पक्षात कोण राहील? त्यामुळे ज्याला जायचं असेल त्यांना जाऊ द्या असं समजू नका अशी विचारसरणी आजच्या संदर्भात चुकीची आहे. सचिन पायलट समजावून सांगा आणि थांबवा असं ते म्हणाले होते.
कोण आहेत संजय निरुपम?
संजय निरुपम यांनी पत्रकारिता सोडून शिवसेनेत प्रवेश केला. १९९६ मध्ये ते शिवसेनेकडून राज्यसभेचे खासदार होते, पण नंतर ते शिवसेना सोडून कॉंग्रेसमध्ये दाखल झाले. कॉंग्रेसनेही त्यांना राज्यसभेवर उमेदवारी दिली. २००९ मध्ये त्यांनी मुंबई उत्तर जागेवरुन लोकसभा निवडणुका जिंकली. परंतु २०१४ आणि २०१९ मध्ये भाजपाच्या गोपाळ शेट्टी यांनी निरुपम यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. २०१७ ते २०१९ या काळात ते मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्षही होते.