मुंबई – अभिनेत्री कंगना राणौत प्रकरणावरुन आक्रमक झालेल्या विश्व हिंदू परिषदेने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अयोध्येत येऊ नका असं बजावलं. यावरुन आता काँग्रेस मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्र्यांची पाठराखण करत विश्व हिंदू परिषदेने जास्त वळवळ करु नये असा इशाराच दिला आहे.
याबाबत मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले की, विश्व हिंदू परिषद धर्माचे मालक नाहीत, त्यांनी जास्त वळवळ करु नये, विश्व हिंदू परिषदेत केवळ हिंदू नाव आल्याने धर्म त्यांचा झाला का? आम्ही हिंदू नाही का? यांचे बापाचे आम्ही बांधील नाही. विश्व हिंदू परिषदेने राष्ट्रीय भानगडीत पडू नये असं त्यांनी सांगितले.
तसेच अयोध्या कोणाच्या बापाच्या मालकीची नाही, कोणी कोणाला रोखू शकत नाही, हिंमत असेल तर रोखून दाखवावं. ज्या दिवशी वाटेल तेव्हा उद्धव ठाकरे जातील. हा प्रश्न धार्मिक भावनेचा आहे. अयोध्या आंदोलन विश्व हिंदू परिषद कुठे होती असा सवालही मंत्री विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे.
काय म्हणाले होते विश्व हिंदू परिषद?
अभिनेत्री कंगना रणौत व शिवसेना यांच्यातील वादात कंगनाला पाठिंबा देत येथील संतांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विरोध सुरू केला. संत आणि विश्व हिंदू परिषदने उद्धव ठाकरे यांनी अयोध्येत येऊ नये अशी घोषणा केली व ते आल्यास त्यांचे स्वागत तर होणार नाहीच; पण विरोधाला त्यांना तोंड द्यावे लागेल असं त्यांनी म्हटलं होतं. अभिनेत्री कंगना राणौत हिला द्रौपदीच्या रूपात दाखवलेली भित्तीपत्रके येथे चिकटवण्यात आली होती. या भित्तीपत्रकांत द्रौपदीचे वस्त्रहरण (चिरहरण) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करताना, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भगवान कृष्णाच्या रूपात दाखवून तिचे संरक्षण करताना दिसत होते.
कंगना राणौत वादावरुन महाविकास आघाडीचं मौन
अभिनेत्री कंगना रणौत हा विषय आमच्यासाठी संपला. आम्ही याबाबत चर्चा करणे सोडून दिले आहे, अशा शब्दात शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी कंगनाबाबत कोणतेच भाष्य करण्यास स्पष्ट नकार दिला. शिवसेनेने कंगनासोबत संघर्षाचा पवित्रा घेतल्याने विनाकारण वादंग निर्माण होत असल्याची भावना महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून व्यक्त झाली होती.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही सूचकपणे सबुरीचा सल्ला दिला. या साऱ्या घडामोडीनंतर शिवसेनेने या प्रकरणी आता कोणतेच विधान करायचे नाही, अथवा जाहीर भूमिका घ्यायची नाही, असा पवित्रा घेतला आहे. कंगनाने मुख्यमंत्र्यांवर थेट टीका केली असतानाही संजय राऊत यांनी यावर बोलण्यास नकार दिला. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार नाराज असल्याची अफवा माध्यमांनी पसरवू नये, असे काहीही घडलेले नाही. कंगना रणौत हा विषय आमच्यासाठी संपला आहे. आम्ही ते विसरुन गेलो. ती काय ट्विट करते, ते वाचले नाही. आम्ही फक्त सामना वाचतो, असं संजय राऊत म्हणाले होते.
काँग्रेस हायकमांडच्या नेत्यांना न बोलण्याच्या सूचना
कंगना रणौतप्रकरणी काँग्रेस नेत्यांनी अथवा प्रवक्त्यांनी कोणतेही विधान करू नये. कोणतीही प्रतिक्रिया देण्याच्या फंदात पडू नये. यासंदर्भातील वाहिन्यांवरील चर्चेतही जाऊ नये, अशा स्पष्ट सूचना दिल्लीतील काँग्रेस हायकमांडने महाराष्ट्रातील नेत्यांना दिल्या आहेत. स्वत: पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनीच या प्रकरणी काँग्रेस नेत्यांना न बोलण्याचे फर्मावल्याची चर्चा प्रदेश नेत्यांमध्ये होती. विशेषत: वाहिन्यांवरील चर्चेत अथवा माध्यमांशी बोलणाऱ्या नेत्यांनी हायकमांडच्या सूचनेनंतर मौन बाळगणे पसंद केले आहे.