महाविकास आघाडीत बिघाडी? काँग्रेसच्या मंत्र्यांमध्ये नाराजी; 'अर्थ'पूर्ण मुद्द्यांवरून तक्रारी
By कुणाल गवाणकर | Published: November 18, 2020 05:59 PM2020-11-18T17:59:27+5:302020-11-18T18:44:37+5:30
खात्यांना निधी मिळत नसल्यानं काँग्रेसचे मंत्री नाराज
मुंबई: महाविकास आघाडी सरकारमध्ये बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वारंवार प्रयत्न करूनही निधी मिळत नसल्यानं काँग्रेसचे मंत्री नाराज असल्याचं समजतं. काँग्रेसच्या खात्यांना निधी, पॅकेज मिळत नाहीत. त्यामुळे याचा अप्रत्यक्ष फटका काँग्रेसला बसत असून जनतेच्या नाराजीचा सामना करावा लागत असल्याचं काँग्रेसच्या मंत्र्याचं म्हणणं आहे. काँग्रेसच्या मंत्र्यांनी याबद्दल स्पष्ट शब्दांत त्यांची नाराजी व्यक्त केली आहे.
राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या मंत्र्यांच्या विभागांना निधी मिळतो. पण काँग्रेसकडे असलेल्या खात्यांना निधी, पॅकेज देण्यात येत नाही, अशी काँग्रेस मंत्र्यांची तक्रार आहे. आपत्ती आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी याबद्दलची नाराजी बोलून दाखवली. 'दिवाळीच्या आधी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाला पॅकेज जाहीर करण्यात आलं. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला. तसंच पॅकेज एमएसईबीलादेखील मिळायला हवं होतं,' असं वडेट्टीवार म्हणाले.
परिवहन मंत्रालय शिवसेनेकडे आहे. या खात्यासाठी दिवाळीआधी १ हजार कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर करण्यात आलं. त्यामुळे मंत्रालयानं एसटी कामगारांचे तीन महिन्यांचे पगार काढले. तशाच पॅकेजची गरज ऊर्जा मंत्रालयालादेखील आहे. मात्र या विभागाकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार अप्रत्यक्षपणे काँग्रेसकडून करण्यात येत आहे. 'ऊर्जा मंत्रालयाला पॅकेज मिळावं यासाठी अर्थ मंत्रालयाला ८ वेळा प्रस्ताव देण्यात आला. मात्र अद्याप मदत मिळालेली नाही. राज्य सरकारच्या तिजोरीवर कोरोनामुळे ताण आहे. केंद्राकडून राज्याला कोणतीही मदत मिळालेली नाही,' असं ऊर्जामंत्री नितीन राऊत म्हणाले.
महाविकास आघाडी सरकारकडून जनतेचा विश्वासघात- फडणवीस
महाविकास आघाडी सरकारनं जनतेचा विश्वासघात केला आहे. कॅबिनेटच्या बैठकीनंतर सरकारमधील मंत्र्यांनी वीजबिलात दिलासा देण्यात येईल असं म्हणत स्वत:ची पाठ थोपटून घेतली. मात्र यानंतरही जनतेला अवाजवी बिलं आली. एखाद्या व्यक्तीनं त्याच्या घरातली सर्व उपकरणं २४ तास वापरल्या तरीही ५ वर्षे जितकं बिल येणार नाही, तितक्या रकमेचं बिल ३ महिन्यांसाठी आलं आहे, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.
राज्यातील ऊर्जा विभागासाठी दीड ते दोन हजार कोटींचा फटका फार मोठा नाही. याशिवाय केंद्र सरकार यासाठी कर्ज देण्यास तयार होतं. मात्र राज्य सरकारनं कर्ज घेतलं नाही. त्याचा फटका राज्यातल्या जनतेला बसत आहे. एसटी महामंडळाला निधी मिळाला ही चांगली गोष्ट आहे. पण वीज मंडळालादेखील पॅकेज मिळायला हवं होतं. कोरोना काळात इतर सर्व राज्यांनी विजबिलात सूट दिली आहे. पण महाविकास आघाडी सरकारनं जनतेचा विश्वासघात केला, अशी टीका फडणवीसांनी केली.