Hiraman Khoskar Ajit Pawar: विधान परिषद निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराला मतदान केल्याचा ठपका ठेवत काँग्रेसने आमदार हिरामण खोसकर यांना दूर केले. विधानसभा निवडणूक जवळ आल्याने हिरामण खोसकर काँग्रेसकडून उमेदवारी निश्चित करण्याचे प्रयत्न करत होते. पण त्यात यश न आल्याने त्यांनी शरद पवारांचीही भेट घेतली. त्यानंतर त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला.
अजित पवारांच्या देवगिरी या शासकीय बंगल्यावर आमदार हिरामण खोसकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
क्रॉस व्होटिंगमुळे काँग्रेसने केलं दूर
हिरामण खोसकर हे इगतपुरी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते. काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीतील विशेषतः काँग्रेसमधील काही आमदारांनी क्रॉस व्होटिंग केले. त्यामुळे शेकापचे जयंत पाटील यांचा पराभव झाला होता.
काँग्रेसच्या आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याचे म्हटले जाते, त्यात हिरामण खोसकर यांचेही नाव चर्चिले गेले. ज्या आमदारांनी क्रॉस व्होटिंग केली. त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीत तिकीट न देण्याची भूमिका काँग्रेसने घेतली. यापैकी काँग्रेसचे आमदार राहिलेल्या जितेश अंतापूरकर यांनी यापूर्वीच भाजपामध्ये प्रवेश केला आहे. झिशान सिद्दिकीही अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार असल्याचे म्हटले जाते. त्याचबरोबर आमदार सुलभा खोडके यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे.
हिरामण खोसकर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून लढणार?
2019 च्या विधानसभा निवडणुकीत हिरामण खोसकर काँग्रेसच्या तिकिटावर लढले होते. युतीमध्ये ही जागा शिवसेनेकडे होती. शिवसेनेच्या उमेदवार निर्मला गावित यांचा पराभव खोसकर यांनी केला होता. खोसकर विद्यमान आमदार असल्याने ही जागा महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची भूमिका काय असेल, हेही महत्त्वाचे आहे. हिरामण खोसकर हे तिकिटाची हमी देणाऱ्या नेत्यांच्या भेटीगाठी घेताना दिसत होते. ज्याअर्थी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, त्याअर्थी त्यांना उमेदवारी मिळणार, असेच स्थिती असल्याची चर्चा होत आहे.