काँग्रेस आमदार हिरामण खोसकर अचानक शरद पवारांच्या भेटीला; कारण आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2024 11:09 AM2024-10-06T11:09:02+5:302024-10-06T11:12:38+5:30

Hiraman Khoskar meet Sharad Pawar: विधानसभा निवडणुकीत उमेदवारीसाठी इच्छुकांची धावपळ सुरू झाली असून, क्रॉस व्होटिंगमुळे चर्चेत आलेले इगतपुरीचे काँग्रेस आमदार हिरामण खोसकर यांनी अचानक शरद पवारांची भेट घेतली. 

Congress MLA Hiraman Khoskar met Sharad Pawar, demanding that Congress nominate candidate from Igatpuri Assembly Constituency | काँग्रेस आमदार हिरामण खोसकर अचानक शरद पवारांच्या भेटीला; कारण आले समोर

काँग्रेस आमदार हिरामण खोसकर अचानक शरद पवारांच्या भेटीला; कारण आले समोर

Maharashtra Elections 2024: राज्यातील विधानसभा निवडणूक आता काही आठवड्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे विद्यमान आमदार आणि इच्छुकांकडून उमेदवारी मिळवण्यासाठी धडपड सुरू आहे. आता काँग्रेसचेइगतपुरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार हिरामण खोसकर यांनी अचानक रविवारी (६ ऑक्टोबर) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीचे कारण इगतपुरीतून काँग्रेसमधून उमेदवारी मिळावी, हे आहे. (Congress Mla Hiraman Khoskar meets Sharad Pawar)

विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या काही आमदारांनी क्रॉस व्होटिंग केले. महायुतीच्या उमेदवारांना मतदान केलेल्या आमदारांमध्ये हिरामण खोसकर यांच्या नावाचीही चर्चा झाली. अशा आमदारांवर कारवाई न करता काँग्रेसने त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी न देण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते. त्यामुळे आमदार हिरामण खोसकर यांनी काँग्रेसकडून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

शरद पवारांची भेट; हिरामण खोसकर यांनी सांगितले कारण

शरद पवारांची भेट घेण्यापूर्वी काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर म्हणाले, "माझं म्हणणं इतकंच आहे की... शरद पवारांना मी विनंती करायला आलो आहे. इगतपुरी मतदारसंघातून मी काँग्रेसकडे उमेदवारी मागतोय. मी वारंवार जातोय. पण, काँग्रेसवाले अजूनही माझी उमेदवारी जाहीर करत नाहीयेत किंवा मला शब्द देत नाहीयेत. म्हणून साहेबांना (शरद पवार) विनंती करायला आलोय की, मागे जे काही क्रॉस व्होटिंग झालं, ते मी केलं नाही. तरी पण माझ्यावर ठपका ठेवला आहे. मी शंभर टक्के मिलिंद नार्वेकरांना मतदान केलं आहे. तेच साहेबांना (शरद पवार) सांगायला आलोय की, मला काँग्रेसकडून उमेदवारी द्या."

"आरोप काय करतात, कशामुळे करतात? मी पक्षासोबतच आहे. पक्षालाच मतदान केलेलं आहे. आम्हा सात जणांना मिलिंद नार्वेकरांना मतदान करायला सांगितलं. तीन आदिवासी, दोन एससी आणि दोन सर्वसाधारण असे होते. म्हणून मी साहेबांना (शरद पवार) विनंती करायला आलोय की, तुम्ही थोरात साहेबांना, पटोले साहेबांना सांगा की मला उमेदवारी द्या", असे हिरामण खोसकर म्हणाले. 

जितेश अंतापूरकरांचा भाजपामध्ये प्रवेश

क्रॉस व्होटिंग केलेल्या आमदारांची नावे काँग्रेसकडून जाहीर केली गेली नाहीत. मात्र, राजकीय वर्तुळात ज्या नावांची चर्चा होत आहे, त्यात झिशान सिद्दीकी, जितेश अंतापूरकर, सुलभा खोडके यांच्यासह काही जण आहेत. यातील जितेश अंतापूरकर यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. झिशान सिद्दीकी आणि सुलभा खोडके हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे. सुलभा खोडके यांचे पती आणि झिशान सिद्दीकी यांचे वडील आधीच अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले आहेत. 

Web Title: Congress MLA Hiraman Khoskar met Sharad Pawar, demanding that Congress nominate candidate from Igatpuri Assembly Constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.