प्रज्ञा सिंह ठाकुर यांच्या गोमुत्राच्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; काँग्रेस आमदाराचा आरोग्यमंत्र्यांना सवाल, "आता कोरोनावरील उपचार..."
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2021 10:04 AM2021-05-20T10:04:39+5:302021-05-20T10:04:39+5:30
गोमुत्र प्राशन केल्यानं कोरोनाचे उपचार होऊ शकतात हे DRDO आणि ICMR च्या वैज्ञानिकांनी मानलंय का? आमदाराचा सवाल.
गोमुत्र प्राशन करत असल्यानं आपल्याला कोरोनाची झाली नाही या भाजप खासदार प्रज्ञा सिंह ठाकुर यांच्या वक्तव्यावरून मध्य प्रदेशचे काँग्रेसचे आमदार पीसी शर्मा यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांना पत्र लिहिलं. तसंच त्यांनी या वक्तव्यावरून टीकाही केली. गोमुत्र प्राशन केल्यानं कोरोनावर उपचार होऊ शकतात हे डीआरडीओ (DRDO) आणि आयसीएमआरनं (ICMR) वैज्ञानिकदृष्ट्या मान्य केलं आहे का? असा सवाल शर्मा यांनी पत्राद्वारे केला. शर्मा यांनी या पत्रासह आरोग्यमंत्र्यांना गोमुत्रदेखील पाठवलं आहे.
"मी स्वत: गोमुत्राचा अर्क घेते. त्यामुळेच मला कोणत्याही प्रकारचं औषध घ्यावं लागत नाही. मला कोरोनाही झाला नाही. सर्व लोकांनी स्वदेशी गायीचं पालन केलं पाहिजे," असं वक्तव्य भाजपच्या खासदार प्रज्ञा सिंह ठाकुर यांनी केलं होतं. भोपाळमध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी यावर वक्तव्य केलं होतं. त्यांच्या वक्तव्यावरून आता राजकारण तापू लागलं आहे.
गोमुत्र प्राशन केल्यानं फुफ्फुसातील संसर्ग दूर होतो; मी घेते, म्हणूनच कोरोना झाला नाही : खा. प्रज्ञा सिंह ठाकुर
"खासदार प्रज्ञा सिंह ठाकुर या भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आहे. तर डीआरडीओ आणि आयसीएमआरनं वैज्ञानिकदृष्ट्या गोमुत्रामुळे कोरोनावर उपचार केले जाऊ शकतात हे मान्य केलं आहे का?," असा सवाल शर्मा यांनी आरोग्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे. "यासाठीच मी तुम्हाला गोमुत्र पाठवत आहे. कोरोनानं त्रासलेल्या जनतेला वैज्ञानिकदृष्ट्या कोरोनापासून वाचण्यासाठी तुम्ही योग्य संदेश द्याल अशी अपेक्षा करतो," असंही ते म्हणाले.
दिशाभूल करण्यासाठी वापर ?
"निश्चितच आम्ही गायीला माता मानतो आणि गाईचं दुध हे पौष्टीक असतं. गायीच्या गोबराचं आणि गोमुत्राचं धार्मिक महत्त्वदेखील आहे. परंतु या धार्मिक भावनेचा वापर जनतेची दिशाभूल करण्यासाठी केला जातोय का? कोरोना, ब्लॅक फंगस यांच्यावर उचार हे ऑक्सिजन, रेमडेसिवीर. एम्फोटेरिसिन इंजेक्शन किंवा टोसिलिजुमॅब इंजेक्शन यांच्यापासून न होता गोमुत्रानं होणार आहे? आता काय लसीकरणाची आवश्यकता नाही?," असं सवालही त्यांनी केले आहेत.