मुंबई : मुंबईत दैनंदिन रुग्णवाढीत घट होत असून, बऱ्या झालेल्या रुग्णांचा दर ९२ टक्के झाला आहे, तर रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी १८९ दिवसांवर आला आहे. शहर उपनगरात दिवसभरात २ हजार ३७ रुग्ण बरे झाले असून, आतापर्यंत एकूण ६ लाख २९ हजार ४१० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या ३८ हजार ६४९ रुग्ण उपचाराधीन आहेत. याच दरम्यान मुंबईत लसीकरण देखील सुरू आहे. लसीकरणावरून काँग्रेसने शिवसेनेवर (Shivsena) जोरदार निशाणा साधला आहे. काँग्रेस (Congress) आमदार झिशान सिद्दीकी (Zeeshan Siddique) यांनी सणसणीत टोला लगावला आहे. "लसींपेक्षा पोस्टर्स जास्त, शिवसेनेच्या पर्सनल पार्टी फंडाद्वारे लस विकत घेतल्या आहेत का?" असं म्हटलं आहे.
झिशान सिद्दीकी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. झिशान यांनी आपल्या ट्विटरवर लसीकरण केंद्राजवळील शिवसेनेच्या चार पोस्टर्सचे फोटोही शेअर केले आहेत. लसीकरण केंद्रांच्या उद्घाटनाचे उदात्तीकरण थांबवा, हे आपले कर्तव्य आहे असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे. "वांद्रे पूर्व भागातील शिवसेनेच्या भव्य लसीकरण उत्सवात आपले स्वागत आहे. येथे लसींपेक्षा पोस्टर्स जास्त आहेत. शिवसेनेच्या पर्सनल पार्टी फंडाद्वारे लस विकत घेतल्या आहेत का? कारण मला कुठेही महाविकास आघाडीचा उल्लेख दिसत नाही. लसीकरण केंद्रांच्या उद्घाटनाचे उदात्तीकरण थांबवा, हे आपले कर्तव्य आहे!" असं झिशान सिद्दीकी यांनी म्हटलं आहे.
मुंबईत रुग्ण दुपटीचा काळ १८९ दिवसांवर, दिवसभरात १,९४६ बाधित
मुंबईत गुरुवारी १,९४६ रुग्ण, तर ६८ मृत्यूंची नोंद झाली आहे. आता कोरोनाबाधितांची एकूण संख्या ६ लाख ८४ हजार ४८ झाली आहे, तर मृतांचा एकूण आकडा १४ हजार ७६ आहे. ६ ते १२ मेपर्यंत मुंबईतील कोविड वाढीचा दर ०.३६ टक्का असल्याची नोंद आहे. रुग्णांचा शोध घेण्यासाठी दिवसभरात ३०,८८६ चाचण्या, तर आतापर्यंत ५८ लाख २६ हजार ७४ कोरोना चाचण्या करण्यात आल्या.
"लस आयातीसाठी राष्ट्रीय धोरण तयार करा, दुसरा डोस देण्यासाठी तातडीने २० लाख डोस द्या"
परदेशातून लस आयात करण्यासाठी केंद्र शासनाने राष्ट्रीय धोरण तयार करावे, काळी बुरशी (म्युकरमायकोसीस) आजारावरील इंजेक्शनचा महाराष्ट्रासाठी कोटा वाढवून मिळावा आणि या औषधावरील एमआरपी कमी करावी. राज्यातील नागरिकांचा लसीचा दुसरा डोस पूर्ण होण्यासाठी तातडीने २० लाख डोस द्यावेत, अशी मागणी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे केल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दृरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून महाराष्ट्रासह सहा राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांशी संवाद साधला. त्याविषयी माध्यमांना माहिती देतांना आरोग्यमंत्री राजेश टोपे बोलत होते.