जयपूर – राज्यसभेच्या ३ जागांसाठी निवडणुकीपूर्वीच राजस्थानमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. काँग्रेसने त्यांच्या आमदारांना बुधवारी जयपूरच्या एका हॉटेलमध्ये थांबवले आहे. आमदार भाजपाच्या संपर्कात येऊ नये यासाठी काँग्रेसने ही खबरदारी घेतली आहे. याचदरम्यान वसुंधरा राजे यांच्या संपर्कात असलेल्या अपक्ष आमदारांवरही मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी नजर ठेवली आहे.
काही अपक्ष आमदार काँग्रेसला समर्थन देण्याच्या तयारीत आहेत. भाजपाचे बंडखोर नेते आणि अपक्ष आमदार ओमप्रकाश हुडला यांनी आम्ही अशोक गहलोत यांच्यासोबत आहोत असं सांगितले आहे. वसुंधरा राजे यांच्या निकटवर्तीय असल्याचं विचारलं असता त्यांनी वेळेसोबत निर्णय घ्यावे लागतात असं सांगितले. तसेच त्यांनी पैशांची ऑफर असल्याचाही नकार दिला.
राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी काँग्रेस आमदारांना पैसे ऑफर देण्यावरुन विचारले असता त्यांनी मला माहिती नाही, कोणत्या आमदाराला कोण ऑफर देत आहे, पण असं असेल तर याची चौकशी व्हायला हवी. काँग्रेस आमदार एकत्र आहेत असं त्यांनी स्पष्ट केले. काही सचिन पायलट समर्थक आमदार नाराज असल्याची चर्चेलाही त्यांनी पूर्णविराम दिला. राज्यसभा निवडणुकीत सर्व आमदार एकत्र आहोत, कोणीही नाराज नाही, मी प्रदेश काँग्रेसचा अध्यक्षही आहे, त्यामुळे काँग्रेसच्या सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्याची जबाबदारी माझ्यावर आहे असं ते म्हणाले.
सचिन पायलट यांचे निकटवर्तीय आमदार राकेश पारीख यांनी सांगितले की, रिसोर्टमध्ये ठेवण्याची गरज नाही, आम्हाला कोणी विकत घेऊ शकत नाही. आम्ही आमच्या नेत्यासोबत आहोत, हा नेता कोण आहे हे तुम्हाला माहिती आहे असं म्हणाले. यापूवी बुधवारी रात्री मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी काँग्रेस पक्षाचे आमदार एकत्र असून ते कोणत्याही अमिषाला बळी पडणार नाहीत असं सांगितले. त्यांनी भाजपावर काँग्रेसचे आमदार विकत घेण्याचा घोडेबाजार करत असल्याचा आरोपही केला.
दरम्यान, आमचे आमदार प्रामाणिक आहेत, त्यांना माहिती आहे, त्यांना अनेक ऑफर देण्याचा प्रयत्न केला गेला, पण हे भारतातील एकमेव राज्य आहे ज्याठिकाणी पैशाने व्यवहार होत नाहीत. इतिहासातही असं काही सापडणार नाही. मला गर्व आहे मी अशा राज्याचा मुख्यमंत्री आहे ज्याठिकाणी कोणताही व्यवहार आणि अमिषाच्या लालसेपोटी सरकारची साथ न सोडणारी माणसं आहेत. राज्यात सरकार स्थिर राहील असं मुख्यमंत्री म्हणाले.