जयपूर – राजस्थानच्या २ जागांसाठी पोटनिवडणूक होत असून प्रचाराला रंगत आली आहे. याचवेळी मंगळवारी एका नेत्याच्या मृत्यूनं हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत(CM Ashok Gehlot) यांच्या कार्यक्रमावेळी व्यासपीठावर सूत्रसंचालन करणाऱ्या युवक काँग्रेसच्या नेत्याला ह्दयविकाराचा जोरदार झटका आला. यात युवा काँग्रेस(Congress) नेत्याचं निधन झालं. ज्यावेळी त्यांचा मृत्यू झाला तेव्हा ते माईकवर बोलत होते.
राजस्थानच्या धरियावद विधानसभा मतदारसंघातील जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. या जागेवर विधानसभा पोटनिवडणुकीत सत्ताधारी काँग्रेसकडून लसाडिया येथे जाहीर सभेचे आयोजन केले होते. या सभेला मुख्यमंत्री अशोक गहलोत संबोधित करणार होते. यावेळी व्यासपीठावर संचालनाची जबाबदारी मोहब्बत सिंह निंबोल यांच्याकडे होती. राजस्थान युवक काँग्रेसचे माजी प्रवक्ते असलेले मोहब्बत सिंह निंबोल सूत्रसंचालन करत होते.
जाहीर सभेत काँग्रेस नेते विरोधकांवर तोंडसुख घेत होते. सभेला लोकांची गर्दी झाली होती. काही वेळातच सभास्थळी मुख्यमंत्री अशोक गहलोत पोहचणार होते. मात्र तत्पूर्वी सभेच्या व्यासपीठावर बोलता-बोलता युवक काँग्रेसचे नेते मोहब्बत सिंह निंबोल यांना अचानक ह्दयविकाराचा झटका आला आणि ते जागीच खाली कोसळले. मोहब्बत सिंह यांना तातडीने लसाडियाच्या प्राथमिक आरोग्य केंद्रावर नेण्यात आले. मोहब्बत सिंह निधनावर मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी ट्विट करत शोक व्यक्त केले.
मुख्यमंत्री अशोक गहलोत म्हणाले की, युवक काँग्रेसचे पदाधिकारी राहिलेले काँग्रेसचे सक्रीय कार्यकर्ते मोहब्बत सिंह जे धरियावद पोटनिवडणुकीत त्यांना दिलेली जबाबदारी पार पाडत होते. त्यांच्या आकस्मित निधनानं मनाला वेदना झाल्या. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती लाभो, आणि त्यांच्या कुटुंबियांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती देवो हीच प्रार्थना अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी संवेदना व्यक्त केली आहे. लसाडिया प्राथमिक आरोग्य केंद्रावरील डॉक्टरांनी मोहब्बत सिंह यांची नाजूक स्थिती पाहून त्यांना प्राथमिक उपचारानंतर तात्काळ उदयपूरच्या हॉस्पिटलला घेऊन जाण्याचा सल्ला दिला. मोहब्बत सिंह यांना उदयपूरला घेऊन जात असतानाच वाटेतच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.