मुंबई: शिवसेनेच्या ५५ व्या वर्धानपनदिनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी फेसबुकद्वारे राज्यातील शिवसैनिकांशी संवाद साधला. भाषणाच्या सुरुवातीला हे भाषण करताना, समोर जल्लोष करणारे शिवसैनिक नसल्याने हा संवाद मला भाषण वाटत नाही, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. यानंतर स्वबळाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांनी चांगलीच टोलेबाजी केली. अनेक राजकीय पक्ष करोना काळातही स्वबळाचा नारा देत आहेत. लोक अस्वस्थ असताना स्वबळाचे नारे दिलेत, तर लोक जोड्याने मारतील, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला टोला लगावला. यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (congress nana patole react on cm uddhav thackeray statement over independent election issue)
अलीकडेच काँग्रेसने आगामी काळात स्वबळावर निवडणूक लढण्याची घोषणा केली. यावरून उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केलेल्या संबोधनावेळी काँग्रेसला अप्रत्यक्षरित्या कानपिचक्या दिल्या. अनेक जण स्वबळाचा नारा देत आहेत. स्वबळ म्हणजे केवळ एकट्याने निवडणूक लढणे असे नाही. त्यासाठी ताकद लागते. स्वाभिमान लागतो. कोरोनाचे संकट आहे. अशा वेळी स्वबळाचा नारा दिला, एक हाती सत्ता आणू म्हटले, तर लोक तुम्हाला जोड्याने हाणतील, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. याला आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
“घराबाहेर न पडताही काम होऊ शकतं हे दाखवलं, बाहेर पडलो तर...”: उद्धव ठाकरे
लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार
उद्धव ठाकरे स्वबळावरून नेमके कुणाला बोलले, ते स्पष्ट नाही. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. भाजपनेही परवा स्वबळाचा नारा दिला होता. त्यामुळे उद्धव ठाकरे नेमके कोणाला बोलले, याबाबत स्पष्टता नाही. त्यांच्या वर्धापन दिनाला आम्ही काँग्रेसच्या वतीने शुभेच्छा दिलेल्या आहेत. शिवसेनेचे प्रमुख म्हणून ते बोलत होते. ती त्यांची शैली आहे, असे नाना पटोले म्हणाले.
“एकाच भाषणात किती विरोधाभास, नेमकं काय म्हणायच ते नक्की आहे का?”
दरम्यान, भाजपने उद्धव ठाकरे यांनी केलेल्या संबोधनावरून निशाणा साधला आहे. एकाच भाषणात किती विरोधाभास? नेमक काय म्हणायच ते तरी नक्की आहे का?, असे सांगत घराबाहेर न पडता कामे झाली, बाहेर पडलो, तर अधिक कामे होतील, या मुद्द्यावर कोणते काम उद्धव ठाकरेजी? महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनासंख्या, मराठा आरक्षण कोर्टात न मांडल्याने गमावले, शेतकऱ्यांना मदत नाही, महाराष्ट्र थांबला नाही या जाहिरातीने तुमच समाधान होत असेल महाराष्ट्राचा विकास ठप्प झाल्याची यादी मोठी आहे, अशी टीका केशव उपाध्ये यांनी केली.