मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) दोन दिवसीय बांगलादेश दौऱ्यावर आहेत. कोरोना संकटाच्या काळात पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच परदेश दौरा आहे. बांगलादेशाच्या स्वातंत्र्याला 50 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमासाठी पंतप्रधान मोदींना निमंत्रित करण्यात आले होते. बांगलादेश येथे दाखल होताच पंतप्रधान मोदींना बंदुका आणि तोफांची सलामी देण्यात आली. यावेळी आयोजित विशेष कार्यक्रमात बोलताना बांगलादेशचा स्वातंत्र्यलढा माझ्यासाठी पहिले आंदोलन होते. त्यावेळी मला अटकही झाली होती, अशी आठवण पंतप्रधान मोदींनी सांगितली. यावरून काँग्रेसने मोदींवर हल्लाबोल केला आहे. "मोदीजी अजून किती फेकणार?, हद्द झाली राव" असं म्हणत निशाणा साधला आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Congress Nana Patole) यांनी पंतप्रधानांवर जोरदार टीका केली आहे. नाना पटोले यांनी मोदीजी अजून किती फेकणार अशी विचारणा केली आहे. तसेच तुम्ही शेतकऱ्यांना आंदोलनजीवी म्हणाला होतात. आता तुम्ही कोण झालात ढोंगीजीवी असा हल्लाबोल देखील केला आहे. पटोले यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "अजून किती फेकणार मोदीजी, हद्द झाली राव. शेतकरी आंदोलनावर एक शब्दही तुमच्या तोंडून निघाला नाही आणि स्वातंत्र्याबद्दल बोलण्यासाठी बांगलादेशला जाता. तुम्ही शेतकऱ्यांना आंदोलनजीवी म्हणाला होतात. आता तुम्ही कोण झालात ढोंगीजीवी" असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
बांगलादेश स्वातंत्र्यलढ्यात मलाही अटक झाली होती - पंतप्रधान मोदी
बांगलादेश स्वातंत्र्यलढ्यात आम्हीही सहभागी झालो होतो. तेव्हा मी 20 ते 22 वर्षांचा असेन. माझ्या अनेक सहकाऱ्यांनी बांगलादेशच्या लढ्यात सहभागी होत सत्याग्रह केला होता. ते माझे पहिलेच आंदोलन होते, असे पंतप्रधान मोदी यांनी यावेळी बोलताना सांगितले. बांगलादेश स्वातंत्र्य लढ्याच्या 50 व्या वर्षाच्या निमित्ताने मला निमंत्रण देण्यात आले. या गौरवशाली सोहळ्यात सहभागी होता आले, हे माझे भाग्य समजतो, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. बांगलादेश आणि भारतातील संबंध आणखीन दृढ होतील. येथील नागरिकांचे मन आणि विश्वास दोन्ही भारताने जिंकले आहे. बांगलादेशला 20 लाख कोरोना लसींचा पुरवठा करण्यात आला. या कठीण प्रसंगात बांगलादेशप्रमाणे अनेक देशांच्या पाठीशी भारत खंबीरपणे उभा राहिला. यापुढेही बांगलादेशला कोरोना लसीचा पुरवठा केला जाईल, असे मोदी यांनी यावेळी बोलताना नमूद केले.
"आरक्षण संपवण्याचा भाजपा-RSS चा डाव, धनगर समाजाची केली घोर फसवणूक", नाना पटोलेंचा घणाघात
धनगर समाज हा समाजातील दुर्लक्षित घटक असून काही लोकांनी प्रलोभने दाखवून समाजाची फसवणूक केली. यातून समाजातील मुठभर लोकांचा फायदा झाला पण समाज मात्र वंचितच राहिला. धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन देऊन भारतीय जनता पक्षाने पाच वर्ष राज्यात सत्ता भोगली पण आरक्षण काही दिले नाही, ही धनगर समाजाची घोर फसवणूक आहे, असं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी काही दिवसांपूर्वी म्हटल आहे.
"इंधनावरील कर आणि टोल वसुलीतून मोदी सरकारकडून जनतेची दुहेरी लूट", नाना पटोलेंचा हल्लाबोल
कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना नाना पटोले यांनी धनगर समाज मागणारा नसून देणारा आहे. आरक्षणाच्या बाबतीतही आदिवासींचे काढून आरक्षण द्यावे ही मागणी नाही. पण भारतीय जनता पक्षाने आरक्षणाचे आश्वासन देऊन धनगर व आदिवासी समाजात वाद लावून दिला. पाच वर्ष राज्यात फडणवीस सरकार होते आणि दिल्लीत भाजपाचेच सरकार असतानाही फडणवीस यांनी समाजाला दिलेला शब्द पाळला नाही. सत्ता येताच पहिल्या कॅबिनेट बैठकीत आरक्षणचा निर्णय घेऊ असे आश्वासन त्यांनी दिले होते. धनगर समाजाने वज्रमूठ बांधावी असे आवाहन करून सन्मानाची वागणूक व समाजाला सत्तेत वाटा देण्यासाठी प्रयत्न करू असं पटोले म्हणाले होते.