मुंबई – महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले(Congress Nana Patole) यांनी ठाकरे सरकारला थेट इशारा दिला आहे. काँग्रेस आहे म्हणून सरकार आहे हे लक्षात ठेवा अशा शब्दात नाना पटोलेंनी परखड भूमिका मांडली आहे. काँग्रेस आमदारांना निधी कमी मिळत असल्याच्या तक्रारीवरून नाना पटोलेंनी नाराजी व्यक्त केली.(Congress State President Nana Patole Warns NCP-Shivsena over Congress MLA complain of lack of funds)
काही महिन्यांपूर्वी मंत्री बाळासाहेब थोरात(Balasaheb Thorat) आणि अशोक चव्हाण(Ashok Chavan) यांनीही याच मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची(CM Uddhav Thackeray) भेट घेतली होती, या भेटीनंतर या समस्येवर तोडगा निघेल अशी शक्यता होती, परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) हे काँग्रेस आमदारांना निधी कमी देत असल्याची खंत पक्षातून व्यक्त होत आहे. यातच काँग्रेसला बेदखल करू नका असा इशाराच नाना पटोलेंनी शिवसेना(Shivsena)-राष्ट्रवादी(NCP) काँग्रेसला दिला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी असल्याचं पुन्हा उघड झालं आहे.
याबाबत नाना पटोले म्हणाले की, एखादी गोष्ट कमी मिळत असेल तर ती बोलल्यास चूक म्हणता येणार नाही, महाविकास आघाडी किमान समान कार्यक्रमावर आहे, समान वाटप व्हावं इतकीच आमची अपेक्षा आहे, काँग्रेस आहे म्हणून सरकार आहे, हे लक्षात असू द्या असा अप्रत्यक्षपणे इशाराच त्यांनी शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसला कठोर शब्दात दिला.
विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसचेच
त्याचसोबत नाना पटोलेंनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर ते पद रिक्त आहे, यापदावर राष्ट्रवादी आणि शिवसेना दोन्ही पक्षांनी दावा केला, परंतु विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहील असं वारंवार सांगितलं जात आहे. विधानसभा अध्यक्षपदाची निवड बिनविरोध नेमण्याची राज्याची परंपरा आहे, ती सत्ताधारी आणि विरोधकांनी एकत्र बसून कायम ठेवावी, या संविधानिक पदाची निवड करताना कोणताही वाद होऊ नये ही आमची भूमिका असल्याचं प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी सांगितले.
देशभरातील टोल बंद करावेत
जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर निचांकी पातळीवर असताना देशात मात्र दररोज इंधनाचे दर वाढवून जनतेची लूट सुरु आहे. एकीकडे केंद्र सरकार पेट्रोल व डिझेलवर अवाजवी अबकारी कर लावून जनतेला लूटत आहे. त्यातच रस्ते विकास सेसच्या नावाखाली १८ रुपये आणि कृषी सेसच्या नावाखाली ४ रुपये असे तब्बल २२ रुपये प्रति लिटर सेस पेट्रोल, डिझेलवर आकारून दोन्ही हाताने जनतेची लूट सुरु केली आहे. त्यातच राष्ट्रीय महामार्गावरील टोलच्या माध्यमातूनही लूट सुरु आहे. केंद्रातील मोदी सरकारने एक तर रस्ते विकास सेस बंद करावा किंवा देशभरातील टोल बंद करावेत अशी मागणीही काँग्रेसने केली आहे.