चंद्रकांत पाटलांच्या गावात शिवसेना एकाकी; काँग्रेस-राष्ट्रवादी झाली भाजपाची सोबती
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2021 02:58 PM2021-01-06T14:58:59+5:302021-01-06T15:01:32+5:30
कोल्हापूरच्या खालापूरमध्ये वेगळीच राजकीय समीकरणं; आघाडीची सर्वत्र चर्चा
कोल्हापूर: राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध भारतीय जनता पक्ष यांच्यात दररोज जोरदार सामना सुरू असताना कोल्हापुरातल्या एका गावातील निवडणूक सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या खानापूर गावात शिवसेनेला रोखण्यासाठी भाजपनं काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीसाठीचे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत सोमवारी (४ जानेवारी) संपली. त्यामुळे आता प्रत्येक गावातील चित्र स्पष्ट झालं आहे. चंद्रकात पाटील यांच्या खानापूर गावात भाजपनं शिवसेनेला रोखण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली आहे. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस विरुद्ध शिवसेना असं चित्र असताना खानापूरात मात्र अगदी वेगळं चित्र पाहायला मिळत आहे. शिवसेनेचे आमदार प्रकाश अबिटकर यांना रोखण्यासाठी तीन पक्षांनी व्यूहनीती आखली आहे.
स्थानिक निवडणुकांमध्ये वेगवेगळ्या आघाड्या पाहायला मिळतात. या आघाड्यांची समीकरणं विधानसभा, लोकसभा निवडणुकांपेक्षा वेगळी असतात. आमदार, खासदार स्थानिक यामध्ये फारसं लक्ष घालत नाहीत. पक्षाच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या फळीतील नेत्यांकडे स्थानिक निवडणुकांची जबाबदारी असते. अशा निवडणुकांमध्ये पक्षीय राजकारणापेक्षा गटातटाचं राजकारण जास्त महत्त्वाचं ठरतं.