धुळ्यात काँग्रेसला संधी; पण उमेदवार कोण?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2019 04:05 AM2019-01-31T04:05:44+5:302019-01-31T04:06:35+5:30

धुळे लोकसभा मतदारसंघ हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता; परंतु मागील दोन निवडणुकांमध्ये धुळे लोकसभेवर भाजपाचे वर्चस्व राहिले आहे.

Congress offers chance to Dhule; But who is the candidate? | धुळ्यात काँग्रेसला संधी; पण उमेदवार कोण?

धुळ्यात काँग्रेसला संधी; पण उमेदवार कोण?

googlenewsNext

- राजेंद्र शर्मा

धुळे लोकसभा मतदारसंघ हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता; परंतु मागील दोन निवडणुकांमध्ये धुळे लोकसभेवर भाजपाचे वर्चस्व राहिले आहे. यावेळी काँग्रेसला हा मतदारसंघ आपल्या ताब्यात घेण्याची संधी आहे.

धुळयात झालेल्या काँग्रेसच्या जिल्हा पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकीनंतर उमेदवारीसाठी इच्छुक माजी मंत्री रोहिदास पाटील, जि. प. अध्यक्ष शिवाजीराव दहिते, डॉ. तुषार शेवाळे, प्रसाद हिरे, जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर, जिल्हा बॅँक संचालक हर्षवर्धन दहिते व मालेगावचे महापौर शेख ही सात नावे पक्षश्रेष्ठींकडे पाठविण्यात आली. डॉ.तुषार शेवाळे वगळता अन्य इच्छुकांनी रोहिदास पाटील यांना उमेदवारी दिल्यास त्यास आपला पाठिंबा असल्याचे बैठकीत सांगितले. त्यामुळे पाटील यांच्या दावेदारीला पाठबळ मिळाले आहे.

दुसरे इच्छुक उमेदवार डॉ. तुषार शेवाळे यांची पक्षाने नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती केली. त्यामुळे पक्षाने दिलेल्या उमेदवाराला निवडून आणण्याची जबाबदारीच टाकून पक्षश्रेष्ठीने डॉ. शेवाळेसह त्यांच्या समर्थकांना विश्वासात घेण्याचा प्रयत्न केला आहे. राज्य पार्लमेंटरी बोर्ड उमेदवार निश्चित करण्यापूर्वीच रोहिदास पाटील यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. काँग्रेसमध्ये असलेला आमदार अमरिशभाई पटेल यांचा ‘अँकर गट’ सुरुवातीपासूनच पाटील यांच्या ‘जवाहर गटा’सोबत दिसत आहे. याशिवाय, भाजपाचे आमदार अनिल गोटे यांनी विद्यमान खासदार व केंद्रीय राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांच्या विरोधात प्रचार करणार असल्याचे जाहीर केल्याने ही बाब काँग्रेसच्या पथ्यावर पडणारी आहे.

भाजपाकडून डॉ. सुभाष भामरे यांचे नाव निश्चित असल्याचे सांगण्यात येते. परंतु पक्षाने केलेल्या सर्वेक्षणात डॉ.भामरे हे ‘डेंझर झोन’ मध्ये असल्याची चर्चा आहे. डॉ. भामरे यांनी याचे खंडण केले असले तरी, हा मुद्दा विरोधकांच्या हाती लागला आहे. डॉ. भामरे हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांचे निकटवर्तीय समजले जातात. त्यांनी मंत्री असतांना मतदारसंघात केलेली विकास कामे ही त्यांची जमेची बाजू आहे. मनमाड-धुळे-इंदूर रेल्वेमार्गाच्या कामाचे भूमीपूजन आचारसंहिता लागू होण्यापूर्वी झाले तर त्याचा फायदा त्यांना मिळू शकेल. पण आमदार अनिल गोटे यांचा विरोध, जानेवारीत प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत मेळाव्यात मालेगाव परिसरातील पदाधिकाऱ्यांची अनुपस्थिती या बाबी भामरे यांच्यासाठी डोकेदुखी ठरणाºया आहेत. शिवसेनेने उमेदवार दिला तर मते विभाजनाचा फटका भाजपाला बसू शकतो. खरी लढत भाजपा-काँग्रेसमध्येच होणार यात शंका नाही.

सध्याची परिस्थिती
गेल्यावेळेस युती होती. यंदा युती झाली नाहीतर शिवसेनेतर्फे पालकमंत्री दादा भुसे (मालेगाव) यांच्यासह माजी आमदार प्रा. शरद पाटील यांच्या नावाची चर्चा आहे.
अन्य पक्षसुद्धा निवडणुकीत उमेदवार देणार का, हे सर्व निवडणुकीआधी स्थापन होणाºया आघाड्या आणि युतीच्या निर्णयावरच ठरेल. गेल्यावेळेस १९ उमेदवार रिंगणात होते.
या मतदारसंघातील प्रस्तावित मनमाड - धुळे-इंदूर रेल्वेमार्ग हा लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. गेल्या पाच वर्षात यावर बरीच चर्चा झाली आहे.
लोकसभा निवडणुकीआधी या रेल्वेमार्गाच्या कामाचे भूमिपूजन होईल, असे सांगण्यात येत आहे. तसे झाले नाहीतर यंदा हा मुद्दा निवडणुकीत कळीचा ठरणार आहे.

धुळे लोकसभा मतदार
एकूण मतदार- 15,75,225
पुरुष- 8,08,302
महिला- 7,66,923

२०१४ मध्ये मिळालेली मते
डॉ. सुभाष भामरे (भाजप)- 5,29,450
अमरीशभाई पटेल (काँग्रेस)- 3,98,727
योेगेश ईशी (बसपा)- 9,897
अन्सारी निहाल अहमद (आम पार्टी)- 9,339
रमेश मोरे (अपक्ष)- 8,057

Web Title: Congress offers chance to Dhule; But who is the candidate?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.