नवी दिल्ली - देशात कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. तर अनेकांचा मृत्यू झाला आहे. येत्या 11 ते 14 एप्रिलपर्यंत 'लसीकरण उत्सव' साजरा केला जाणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी केली आहे. यावरून आता काँग्रेस नेते पी चिदंबरम ( P Chidambaram) यांनी मोदींना सणसणीत टोला लगावला आहे. लसीकरण (Corona Vaccination) मोहीम उत्सव आहे की युद्धअसा सवाल विचारला आहे. पी चिदंबरम यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. तसेच मोदी सरकार लसींच्या पुरवठा आणि वाटपामधील आपलं मोठं अपयश लपवण्यासाठी प्रयत्न करत आहे असं म्हणत हल्लाबोल केला आहे.
"एकदा सरकार म्हणतं की, लसीकरण मोहीम उत्सव आहे. दुसऱ्या दिवशी म्हणतं दुसरं युद्ध आहे. नेमकं काय आहे?" असं पी चिदंबरम यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. तसेच "पंतप्रधानांनी पहिला लॉकडाऊन जाहीर केला तेव्हा त्यांनी 21 दिवसांत युद्ध जिंकू असा दावा केला होता. यावेळी त्यांनी महाभारतातील युद्धाशी तुलना केली होती जे 18 दिवसांत जिंकलं होतं. त्याचं काय झालं?" असं देखील चिदंबरम यांनी म्हणत निशाणा साधला आहे. "पोकळ अभिमान आणि अतिशयोक्ती आपल्याला कोरोनाविरोधात जिंकण्यास मदत करणार नाही. सरकार लसींच्या पुरवठा आणि वाटपामधील आपलं मोठं अपयश लपवण्यासाठी प्रयत्न करत आहे" असा आरोप देखील त्यांनी केला आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. "केंद्र सरकारच्या अपयशी धोरणांमुळे देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. अहंकारी सरकारला चांगल्या सूचनांची अॅलर्जी" आहे असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे. राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "केंद्र सरकारच्या अपयशी धोरणांमुळे देशात कोरोनाची भयंकर अशी दुसरी लाट आहे आणि स्थलांतरित मजूर पुन्हा एकदा गावाकडे परतत आहेत. सर्वसामान्यांचं जीवन व देशाची अर्थव्यवस्था दोन्हींसाठी लसीकरण वाढवण्यासोबतच त्यांच्या हातात पैसा देणं देखील अत्यंत आवश्यक आहे. मात्र अहंकारी सरकारला चांगल्या सूचनांची अॅलर्जी आहे" असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
कोरोनाचा उद्रेक! सर्वोच्च न्यायालयातील 50 टक्के स्टाफ कोरोना पॉझिटिव्ह
कोरोनाचा सर्वोच्च न्यायालयाला (Supreme Court) मोठा फटका बसला आहे. सर्वोच्च न्यायालयातील 50 टक्के स्टाफला कोरोनाची लागण झाल्याची माहिती आता समोर आली आहे. सर्वोच्च न्यायालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश घरातूनच व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुनावणी घेणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाचा संपूर्ण परिसर आणि कोर्ट रुम सॅनिटाईज करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर सर्व ठरलेल्या प्रकरणांवरील सुनावणी एक तास उशिराने होणार आहे. "माझ्या अनेक कर्मचार्यांना आणि लिपिकांना कोरोनाची लागण झाली आहे. काही न्यायाधीशांना यापूर्वीच कोरोनाची लागण झाली होती मात्र आता ते बरे झाले आहेत" अशी माहिती एका न्यायाधीशांनी एनडीटीव्हीसोबत बोलताना दिली आहे.