मुंबई : आगामी वर्षभरात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी काँग्रेस पक्षाने कंबर कसली असून आतापासून नियोजन, रणनीती आखून कामाला सुरुवात केलेली आहे.राज्यात २०२१ मध्ये नवी मुंबई, औरंगाबाद, वसई विरार, कल्याण डोंबिवली, कोल्हापूर या पाच मोठ्या व महत्त्वाच्या महानगरपालिका निवडणुका होत आहेत. तर दोन जिल्हा परिषदा, १३ नगर परिषदा व ८३ नगर पंचायतींसाठी निवडणुका होत आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी १३ सदस्यांची निवडणूक व्यवस्थापन समिती स्थापन केलेली आहे. तसेच या सर्व निवडणुकांसाठी पक्ष निरीक्षकांच्या नेमणुकाही केल्या आहेत. तसेच काँग्रेसच्या १२ मंत्र्यांकडेही संपर्कमंत्रीपदाची जबाबदारी आहे.जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांसाठी सुरेश भोयर - भंडारा, विशाल मुत्तेमवार - गोंदिया यांची निरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यासाठी मोहन जोशी, राहुल दिवे, शीतल म्हात्रे; औरंगाबाद जिल्ह्यासाठी मुजफ्फर हुसेन, किशोर गजभिये, दादासाहेब मुंडे; पालघर जिल्ह्यासाठी राजेश वर्मा, मेहुल होरा, डॉ, गजानन देसाई; कल्याण डोंबिवलीसाठी मधू चव्हाण, अरविंद शिंदे, आणि कोल्हापूर जिल्ह्यासाठी अभय छाजेड, रणजीत देशमुख, पृथ्वीराज साठे यांची निरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी काँग्रेसची तयारी; नियोजनास सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2020 5:39 AM