अकोला : भाजपला राेखण्यासाठी व धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी टाळण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला साेबत घेतले पाहिजे, त्यासाठी ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्यासाेबत चर्चा करण्याची तयारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले यांनी दर्शविली.
पटाेले हे सध्या विदर्भाच्या दाैऱ्यावर असून शुक्रवारी त्यांनी अकाेल्यात पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, २०२४ च्या निवडणुकीत काँग्रेस पक्ष हा पूर्ण ताकदीने सत्ता मिळवेल. त्यासाठी संघटनात्मक बांधणी सुरू असून धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन टाळण्यासाठी आंबेडकरांशी चर्चा करण्याची तयारी आहे. या साेबतच काही छोट्या पक्षांशीही आघाडी करण्याची तयारी असल्याचेही ते म्हणाले.
स्वबळाचा पुनर्उच्चार, आमची भूमिका आम्हीच ठरवू
शरद पवार यांनी २०२४ मध्ये ‘महाविकास आघाडी’ एकत्रित निवडणूक लढणार असल्याचे वक्तव्य केले आहे. याबाबत त्यांना छेडले असता आघाडीबाबत काँग्रेसची भूमिका प्रदेशाध्यक्ष या नात्याने मीच जाहीर करीन, आमची भूमिका आमचाच पक्ष ठरवील. त्यामुळे आगामी निवडणुकांबाबत चर्चा सुरूच असतात. आम्ही मात्र स्वबळावरच निवडणूक लढविण्याची तयारी करत आहाेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभेच्या निवडणुका काँग्रेस पक्ष राज्यात स्वबळावरच लढणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
हमी भाव, शेतकऱ्यांच्या ताेंडाला पाने पुसली
केंद्र सरकारने जाहीर केलेला हमी भाव हा अत्यल्प आहे. एकीकडे पेट्राेल, डिझेलचे भाव वाढत असतानाही दुसरीकडे हमी भाव मात्र ५ टक्केही वाढविलेले नाहीत. वास्तविक दरवर्षी किमान १० टक्के दरवाढ अपेक्षित असतानाही केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या ताेंडाला पाने पुसत आहे, असा आराेप पटाेले यांनी केला.
केंद्र सरकारने हिरावले ओबीसींचे आरक्षण
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये इतर मागासवर्गीयांचे राजकीय आरक्षण रद्द झाले, या प्रकारला केंद्राचे भाजप सरकार जबाबदार असल्याचा आराेप पटाेले यांनी केला. मागास आयाेग स्थापन करण्यात राज्य सरकारची चालढकल आणी सर्वाेच्च न्यायालयात ओबीसींची संख्या सादर करण्यास केंद्राला आलेले अपयश यामुळेच ओबीसींचे आरक्षण रद्द झाल्याचे पटाेले म्हणाले.