आता राहुल गांधींना एकदा संधी देऊन बघू या - राज ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2019 10:06 PM2019-04-06T22:06:38+5:302019-04-06T22:24:44+5:30
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी शिवाजी पार्कच्या सभेत मोदींवर जोरदार प्रहार केला आहे.
मुंबई- मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी शिवाजी पार्कच्या सभेत मोदींवर जोरदार प्रहार केला आहे. मोदींनी देश खड्ड्यात घातल्याचा उल्लेखही त्यांनी केला. ते म्हणाले, नेहरू हे देशाचे पंतप्रधान हे महात्मा गांधींनी ठरवलं, त्यावेळेला पर्याय ठेवला नव्हता, त्यानंतर जितके देशाचे पंतप्रधान झाले, तेव्हा लोकांना पर्याय होता का? मग आताच ही पर्यायाची चर्चा का? नरेंद्र मोदींनी जितका देश खड्ड्यात घातलाय, ह्या पेक्षा अजून खड्ड्यात घालणारा कोण येणार आहे ?, नरेंद्र मोदींना संधी दिली, त्यांनी देश खड्ड्यात घातला, आता राहुल गांधींना संधी देऊन बघू या, खड्ड्यात घालतील किंवा देशाचं चांगलं देखील करून दाखवतील. पण संधी तर देऊन बघू या, असंही राज ठाकरे म्हणाले आहेत. राज ठाकरेंनी एक प्रकारे काँग्रेसला समर्थन दिलं आहे.
देश इतका खड्ड्यात घालून पुन्हा निवडणुकीच्या तोंडावर हे पुन्हा पैसे वाटायला येत आहेत, मी सांगतो आले पैसे द्यायला तर घ्या, कारण हे तुमचेच पैसे आहेत. ह्या लोकांच्या पार्श्वभागावर लाथ मारा आणि हाकलून द्या. मोदी आणि शाह हे राजकीय क्षितिजावरून घालवायची म्हणून काळजावर दगड ठेवून मतदान करा, असं आवाहनही राज ठाकरेंनी मतदारांना केलं आहे. काँग्रेसच्या जुन्या योजनांची नावं बदलून त्यांनी त्या भाजपाच्या योजना म्हणून घोषित केल्या. काँग्रेसला नेहरू गांधींच्या पलीकडे नावं देता येत नाहीत, भाजपाला पंतप्रधान किंवा भाजप हीच का नावं सुचतात. आपल्या देशात इतकी कर्तृत्ववान माणसं जन्माला आली पण त्यांची नावं प्रकल्पांना का देत नाहीत, असा प्रश्नही राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे.
नरेंद्र मोदींना संधी दिली त्यांनी देश खड्ड्यात घातलं, आता राहुल गांधींना संधी देऊन बघूया? खड्ड्यात घालतील किंवा देशाचं चांगलं देखील करून दाखवतील. संधी तर देऊन बघूया.
— MNS Adhikrut (@mnsadhikrut) April 6, 2019
राजीव गांधी, इंदिरा गांधींची हत्या झाली, त्यावेळी अनेकांनी काँग्रेसला मतदान केलं. देश संकटात आल्यास वेगळा विचार करणं गरजेचं असतं. सेनेचा उमेदवार भाजपाला नको, तर भाजपाचा उमेदवार सेनेला नको आहे, मनात नसतानाही सत्तेसाठी या लोकांनी युती केली. काँग्रेसकडून प्रतिभाताईंचं नाव आलं, त्यावेळी बाळासाहेबांनी काँग्रेसला पाठिंबा दिला होता. त्या त्या वेळेला परिस्थितीनुसार निर्णय घ्यावे लागतात. अमित शाह आणि नरेंद्र मोदी जर असे वागले नसते तर मला असं करावं लागलं नसतं, असंही राज ठाकरे म्हणाले आहेत.