जवळपास वर्षभरापासून केंद्र सरकारच्या तीन नवीन कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांची मेहनत फळाला आली आणि आज मोदी सरकारने ते तीनही कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली. यानंतर, आता मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनीही केंद्र सरकारच्या या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे.
सोनिया गांधी यांनी हा अन्नदात्याचा विजय आणि सरकारच्या अहंकाराचा पराभव असल्याचे म्हटले आहे. या निर्णयावर आनंद व्यक्त करताना सोनिया गांधी म्हणाल्या, तब्बल 12 महिन्यांच्या गांधीवादी आंदोलनानंतर, आज देशातील 62 कोटी अन्नदात्यांच्या-शेतकऱ्यांच्या-शेतमजुरांच्या संघर्षाचा आणि इच्छाशक्तीचा विजय झाला आहे. त्या म्हणाल्या, आज 700 हून अधिक शेतकरी कुटुंबांचे बलिदान यशस्वी ठरले. आज सत्य, न्याय आणि अहिंसेचा विजय झाला आहे.
हुकूमशहा राज्यकर्त्यांच्या अहंकाराचा पराभव -केंद्र सरकारवर हल्ला चढवत सोनिया गांधी म्हणाल्या, 'आज सत्तेतील लोकांनी शेतकऱ्यांविरुद्ध रचलेल्या षडयंत्राचा आणि हुकूमशाही राज्यकर्त्यांच्या अहंकाराचाही पराभव झाला. आज रोजीरोटी आणि शेतीवर हल्ला करण्याचा कटही फसला. आज तिन्ही काळे शेतीविरोधी कायदे पराभूत झाले आणि अन्नदाता जिंकला.
एनडीए सरकार शेतकरी विरोधी असल्याचेही सोनिया गांधी म्हणाल्या. तसेच, गेल्या सात वर्षांत भाजप सरकारने शेतीवर सातत्याने वेगवेगळ्या प्रकारे हल्ले केले आहेत. मग, भाजपचे सरकार येताच शेतकऱ्याला दिला जाणारा बोनस बंद करण्याचा मुद्दा असो किंवा अध्यादेश आणून शेतकऱ्याच्या जमिनीचा न्याय्य मोबदला कायदा संपवण्याचा डाव असो, असेही सोनिया गांधी म्हणाल्या.