नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ होत आहे. याच दरम्यान काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी (Congress Priyanka Gandhi) यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. केंद्र सरकारला पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींविषयी प्रश्न विचारला आहे. काँग्रेसप्रणीत यूपीए सरकारच्या काळात जनतेला कसा दिलासा दिला जात होता, याचा हवाला देत प्रियंका गांधी यांनी सोशल मीडियावर केंद्र सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. "संकटाच्या वेळीही केंद्राने पेट्रोल-डिझेलवर कराच्या रुपात देशवासीयांकडून 4 लाख कोटी केले वसूल" असं म्हणत निशाणा साधला आहे.
प्रियंका गांधी यांनी आपल्या फेसबुक पोस्टवरून पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कासंदर्भात मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. पेट्रोल आणि डिझेलवरील करात 12 पट वाढ करुन जनतेची लूट केली जात आहे. "2013 साली जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल 101 डॉलर्स होते तेव्हा त्यावेळी देशातील लोकांना पेट्रोल 66 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 51 रुपये प्रति लिटर दराने मिळत होते. त्यावेळी केंद्र सरकार पेट्रोल प्रति लीटर 9 रुपये तर डिझेलवर 3 रुपये प्रति लीटर कर आकारत होती. पण सन 2021 मध्ये केंद्र सरकार आपल्याकडून पेट्रोल प्रतिलिटर 33 रुपये आणि डिझेलवर 32 रुपये कर वसूल करत आहे."
"भाजपा सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात 12 पट वाढ केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर कमी असताना देशवासीयांना त्याचा फायदा का देण्यात आला नाही? 2014 पासून कर वसुलीत 300 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ योग्य आहे का? केंद्र सरकारने 7 वर्षात पेट्रोलियम उत्पादनांवरील करातून 21.5 लाख कोटी रुपये जमा केले आहेत. पण त्या बदल्यात मध्यमवर्गीय, गरीब आणि व्यापारी वर्गाला काय मिळाले? संकटाच्या वेळीसुद्धा पेट्रोल आणि डिझेलवरील कराच्या रुपात केंद्र सरकारने देशवासीयांकडून सुमारे 4 लाख कोटी रुपये वसूल केले" असं प्रियंका यांनी म्हटलं आहे.
"मोदींनी स्वत:ची पाठ थोपटून घेतली अन् दुसऱ्याच दिवशी लसीकरणामध्ये 40 टक्क्यांची घट झाली"
प्रियंका गांधी यांनी कोरोना लसीवरून (Corona Vaccine) मोदी सरकारवर याआधी जोरदार हल्लाबोल केला होता. "मोदींनी स्वत:ची पाठ थोपटून घेतली अन् दुसऱ्याच दिवशी लसीकरणामध्ये 40 टक्क्यांची घट" अस म्हणत प्रियंका यांनी बोचरी टीका केली होती. "डेल्टा प्लस व्हेरिएंट देशात दाखल झाला आहे. मात्र आत्तापर्यंत फक्त 3.6 टक्के नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालं आहे. पण पंतप्रधान मात्र इव्हेंट मॅनेजरच्या भूमिकेत दिसत आहेत. मोदींनी स्वत:ची पाठ थोपटून घेण्याच्या दुसऱ्याच दिवशी लसीकरणामध्ये तब्बल 40 टक्क्यांची घट झाली आहे" असं प्रियंका गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं.