नवी दिल्ली - जगभरात कोरोनावर संशोधन सुरू असून नवनवीन माहिती समोर येत आहे. अनेक ठिकाणी चाचण्यांना यश आले आहे. केंद्र सरकारने कोरोनावरील कोणत्याही लसीला अद्याप मंजुरी दिलेली नाही. मात्र लसीकरणाची तयारी केली जात आहे. तब्बल 30 कोटी लोकांना कोरोनावरील लस देण्याची तयारी केली जात आहे. प्राथमिकतेनुसार ही लस देण्यात येणार आहे. मात्र आता आरोग्य मंत्रालयाने प्रत्येक भारतीयाला लस देण्याबद्दल सरकारकडून म्हटलं गेलेलं नाही, असं म्हटलं आहे. यावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.
"सर्वांना कोरोना लस देणार असं मोदी म्हणाले पण सरकार म्हणतं म्हणालोच नाही; नक्की भूमिका काय?" असं म्हणत राहुल गांधींनी हल्लाबोल केला आहे. राहुल यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "पंतप्रधान म्हणतात सर्वांना लस मिळणार. बिहार निवडणुकांच्या वेळी बिहारमध्ये सर्वांना मोफत कोरोना लस दिली जाणार असल्याचं म्हटलं गेलं. आता केंद्र सरकार म्हणतं सर्वांना लस देणार असं कधी म्हटलंच नाही. पंतप्रधानांची नक्की भूमिका काय?" असा सवाल राहुल गांधी यांनी केला आहे.
सर्वप्रथम हेल्थ वर्कर्स, फ्रंटलाईन वर्कर्स, सीनियर सिटिझन्सना लसीचा डोस देण्याची तयारी केली जात आहे. लसीकरणासाठी नीती आयोगाने सुचवलेल्या प्लॅननुसार, निवडणुकीसाठी ज्याप्रमाणे पोलिंग बूथ तयार केले जातात. तसेच वॅक्सीन बूथ तयार केले जाणार आहेत. तेथे लसीचा डोस देण्यात येईल. नीती आयोगाचे सद्स्य व्ही. के. पॉल यांनी मुख्यमंत्र्यांना एक प्रेझेंटेशन दिलं. त्यामध्ये याबाबत माहिती दिली आहे. कोरोनाच्या लसीकरणासाठी पोलिंग बूथप्रमाणेच टीम तयार कराव्या लागतील आणि ब्लॉक लेवलवर रणनीती तयार केली जाणार असल्याचं देखील पॉल यांनी म्हटलं आहे.
आशेचा किरण! 30 कोटी लोकांना कोरोना लस देण्यासाठी महातयारी; पोलिंग बूथसारखे "वॅक्सीन बूथ"
आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी दिल्ली, महाराष्ट्र, केरळ आणि राजस्थान या चार राज्यांना यासाठी तयारी करण्यास सांगितलं आहे. कारण या ठिकाणची परिस्थिती ही थोडी चिंताजनक आहे. चारही राज्यातमध्ये हाय पॉझिटिव्हिटी रेट आणि मृत्यूदर चिंतेत भर टाकणारा आहे. येथील रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. तसेच कोरोनामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. सुरुवातीला कोरोनाची लस ही आरोग्य कर्मचारी, कोरोना वॉरिअरना दिली जाणार आहे. यानंतर वरिष्ठ नागरिकांना दिली जाईल. या यादीत ज्यांची नावे असतील त्यांना एसएमएसद्वारे लसीकरणाची तारीख, वेळ आणि ठिकाण कळविले जाणार आहे. मेसेजमध्ये लसीकरण करणारी संस्था, आरोग्य सेवकाचे नाव असणार आहे. पहिला डोस दिल्य़ानंतर दुसरा डोस कधी मिळणार याचीही माहिती एसएमएसद्वारे दिली जाईल.
"झूठ की, लूट की, सूट-बूट की सरकार; मित्रांचं उत्पन्न झालं चौपट, शेतकऱ्यांचं मात्र अर्ध"
गेल्या काही दिवसांपासून दिल्ली सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. दरम्यान, मंगळवारी सरकार व शेतकरी नेत्यांची बैठक झाली. काँग्रेसचे नेते आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा एक व्हिडीओ शेअर करत मोदी सरकारवर हल्लाबोल केला. राहुल गांधी यांनी बुधवारी (2 डिसेंबर) आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "झूठ की, लूट की, सूट-बूट की सरकार" असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे. "शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होणार असं सांगितलं गेलं. पण मित्रांचं उत्पन्न चौपट केलं आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न अर्ध होणार. खोटं बोलणारं, लूटणारं आणि सूट-बूट वालं हे सरकार आहे" असा घणाघात राहुल गांधी यांनी केला आहे. यासोबतच शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा एक व्हिडीओ देखील शेअर करत सरकारवर जोरदार निशाणा साधला.