नवी दिल्ली - संसदेच्या पवसाळी अधिवेशनात पास झालेल्या तीन कृषी कायद्यांसंदर्भात काँग्रेससह जवळपास सर्वच विरोधक केंद्रातील मोदी सरकारचा जोरदार विरोध करत आहेत. सध्या काँग्रेस पंजाबमध्ये 'ट्रॅक्टर यात्रा' काढत आहे. यात काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधीदेखील सहभागी होत आहेत. सोमवारी पंजाबमधील भवानीगड येथून समानापर्यंत ट्रॅक्टर यात्रा काढण्यात आली.
'आपली शेती वाचवा' यात्रेपूर्वी राहुल गांधी यांनी पंजाबमध्ये एका सभेला संबोधित केले. यावेली त्यांनी केंद्रावर जबरदस्त हल्ला चढवला. गांधी म्हणाले, "हे सरकार गेल्या सहा वर्षांपासून गरीब, मजूर आणि शेतकऱ्यांवर एकापाठोपाठ एक आक्रमण करत आहे. यांची एकही नाही अशी नाही, की जिचा गरिबांना फायदा होईल."
राहुल गांधी म्हणाले, "नोटाबंदीनंतर जिएसटी कायदा आणला, आता तुम्ही कुण्याही एखाद्या छोट्या दुकानदाराला अथवा व्यापाऱ्याला विचारा, जीएसटीमुळे काय झाले. अद्यापही छोट्या दुकानदाराला अथवा व्यापाऱ्याला जीएसटी समजलेला नाही."
एवढी घाई कशाची होती?शेतकऱ्यांना संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले, "मी तुम्हाला विचारू इच्छितो, हे कायदे या संकटाच्या काळातच का लागू केले गेले? एवढी घाई कशाची होती? कारण मोदीजींना माहीत आहे, की शेतकरी आणि मजुरांच्या पायावर कुऱ्हाड मारली, की ते घरातून बाहेर निघू शकणार नाहीत. नरेंद्र मोदी केवळ ही व्यवस्था नष्ट करत आहेत. जेथे त्यांनी MSPची हमी द्यायला हवी, तेथे ते या तीन कायद्याच्या माध्यमाने शेतकरी आणि मजुरांना मारत आहेत. त्यांचा गळा कापत आहेत."
"या कायद्यांमुळे शेतकऱ्यांना दोनच पर्याय उपलब्ध असतील. ते म्हणजे, अडानी आणि अंबानी. आता आपणच सांगा, एक शेतकरी त्यांच्याशी लढू शकतो? त्यांच्याशी बोलू शकतो? मुळीच नाही, सर्व काही नष्ट होईल. हेच मोदींचे लक्ष्य आहे. येथे मी केवळ शेतकऱ्यांसाठीच उभा नाही, तर भारतातील सर्व जनतेसाठी उभा आहे. कारण केवळ शेतकरी आणि मजुरांचे नाही, तर संपूर्ण देशाचे नुकसान होत आहे," असेही राहुल गांधी म्हणाले.
आता काँग्रेस मागे हटणार नाही. मोदीजी आपल्याला शेतकऱ्यांची शक्ती ओळखावी लागेल. आता हे शेतकरी आणि मजूर कोरोनाला घाबरून घरात बसणार नाहीत, ते रस्त्यावर उतरतील आणि या कायद्यांचा विरोध करतील. यानंतर राहुल गांधींची ट्रॅक्टर यात्रा समाना येथे पोहोचली. मात्र, येथे अपेक्षेप्रमाणे लोक उपस्थित नव्हते. यावेळी राहुल गांधींच्या भाषणादरम्यान रिकाम्या खुर्च्याही दिसून आल्या.