नवी दिल्ली - काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) हे सातत्याने विविध मुद्द्यांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि भाजपावर (BJP) सातत्याने हल्लाबोल करत आहेत. आता राहुल यांनी मोदी आणि अमित शहांवर (Amit Shah) निशाणा साधला आहे. तामिळनाडूतील निवडणुकांसाठी राहुल सध्या चेन्नई दौऱ्यावर आहेत याच वेळी एका रॅलीला संबोधित करताना त्यांनी पंतधान मोदी आणि अमित शहांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांना मोदी आणि शहांच्या पाया पडताना पाहणं असह्य" असल्याचं म्हणत राहुल यांनी जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.
"भाजपामध्ये मोठ्या नेत्याच्या पायाला स्पर्श करावा लागतो, नरेंद्र मोदी किंवा अमित शहांपुढे वाकावं लागतं" अशा शब्दांत राहुल गांधी यांनी बोचरी टीका केली आहे. "पंतप्रधान मोदी तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांना आपल्या ताब्यात ठेवू पाहत आहेत. त्यांनी त्यांना आपल्या पायाला स्पर्श करण्यासाठी भाग पाडत आहेत. पण मी हे स्वीकारायला तयार नाही. निवडून आलेल्या प्रतिनिधीने अमित शहा यांच्या पायाला स्पर्श करणारा एक फोटो मी पाहिल आहे" असं राहुल यांनी म्हटलं आहे. चेन्नईमधील रॅलीमध्ये त्यांनी विविध मुद्द्यांवरून भाजपावर निशाणा साधला.
"हा अशा प्रकारचा संबंध हा भाजपामध्येच असू शकतो. येथे तुम्हाला पक्षाच्या मोठ्या नेत्यांच्या पायाला स्पर्श करावा लागतो. भाजपामध्ये नरेंद्र मोदी किंवा अमित शहा यांच्यापुढे वाकावं लागतं. देशाचे पंतप्रधान तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यावर नियंत्रण ठेवताना आणि शांतपणे त्यांच्या पायाला स्पर्श करण्यासाठी भाग पाडताना जेव्हा मी पाहतो तेव्हा ते स्वीकारण्यास माझं मन तयार होत नाही. तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांना अमित शहापुढे झुकावसं वाटत नाही. पण त्यांनी केलेल्या भ्रष्टाचारामुळे त्यांना असं करावं लागतं" असं देखील राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
"मी यापुढे RSS चा 'संघ परिवार' असा उल्लेख करणार नाही"; राहुल गांधींनी सांगितलं नेमकं कारण
राहुल यांनी आरएसएस म्हणजेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) निशाणा साधला आहे. यापुढे मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला "संघ परिवार" म्हणणार नाही असं म्हणत त्यांनी आरएसएसवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये महिला आणि वयस्कर व्यक्तींना सन्मान दिला जात नसल्याचं देखील यावेळी राहुल यांनी म्हटलं आहे. राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन याबाबत एक ट्विट केलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला "संघ परिवार" का म्हणणार नाही यामागचं नेमकं कारण सांगितलं आहे. "माझ्या मते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संबंधित संघटनांना संघ परिवार असं म्हणणं योग्य ठरणार नाही. परिवार (कुटुंब) म्हटल्यावर तिथे महिलांचा आणि वयस्कर व्यक्तींचा आदर केला जातो. या व्यक्तींबद्दल आदर आणि प्रेमाची भावना असते. असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये घडत नाही. त्यामुळे मी यापुढे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला संघ परिवार म्हणणार नाही" असं राहुल यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.