नवी दिल्ली - नव्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या कित्येक दिवसांपासून कडाक्याच्या थंडीत शेतकऱ्यांचं आंदोलन (Farmers Protest) सुरू आहे. शेतकऱ्यांसोबत सोमवारी पार पडलेल्या बैठकीत कोणताही तोडगा न निघाल्याने चर्चेची सातवी फेरी देखील निष्फळ ठरली आहे. 8 जानेवारीला पुन्हा चर्चा होणार आहे. तसेच शेतकरी संघटना आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांमध्ये आतापर्यंत बैठकीच्या सात फेऱ्या झाल्या आहेत. मात्र, तीन कृषी कायद्यांबाबत सरकार व शेतकरी यांच्यात सुरू असलेली चर्चा अद्याप संपलेली नाही. याच दरम्यान काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
"मोदी सरकारच्या अहंकाराने 60 पेक्षा अधिक शेतकर्यांचा जीव घेतला" असं म्हणत राहुल गांधींनी टीकास्त्र सोडलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबत एक ट्विट केलं आहे. "मोदी सरकारच्या अहंकाराने 60 पेक्षा अधिक शेतकर्यांचा जीव घेतला आहे. त्यांचे अश्रू पुसण्याऐवजी सरकार त्यांच्यावर अश्रुधुराचा मारा करण्यात व्यस्त आहे. अशी क्रूरता फक्त विशिष्ट भांडवलदारांच्या व्यावसायिक हितसंबंधांना प्रोत्साहन देण्यासाठी आहे. कृषीविरोधी कायदे रद्द करा" असं राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. यासोबतच त्यांनी मोदी सरकार हट्ट सोडा हा हॅशटॅग देखील वापरला आहे.
काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी "युवकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड, जनतेवर महागाईचा अत्याचार. शेतकऱ्यांवर मित्रांच्या कायद्यांचा वार, हेच आहे मोदी सरकार" असं म्हणतकेंद्र सरकारवर निशाणा साधला होता. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून केंद्रावर हल्लाबोल केला होता. तसेच शेतकऱ्यांना वीराची उपमा देत राहुल यांनी "वीर तुम बढे चलो" शिर्षकाखाली चार ओळी लिहील्या. शेतकरी आंदोलकांना दिल्लीच्या सीमेवर प्रशासनाकडून होणारी अडवणूक, त्यांच्यावर होणारे लाठीहल्ले, पाण्याच्या फवाऱ्याचा मारा अशा सर्वांचा उल्लेख राहुल यांनी केला आहे. केंद्र सरकारच्या जाचाला शेतकऱ्यांनी अजिबात घाबरुन जाऊ नये, तुम्ही देशाचे अन्नदाता आहात, असं म्हणत राहुल यांनी शेतकरी आंदोलकांना आत्मविश्वास देण्याचा प्रयत्न केला आहे.
राहुल यांनी या कवितेसोबत शेतकरी आंदोलनाचे काही फोटो देखील ट्विट केले आहेत. या फोटोंमधून शेतकरी आंदोलकांसमोर आव्हानं दाखविण्याचा राहुल यांनी प्रयत्न केला आहे. शेतकरी आंदोलकांवर होणारे पाण्याच्या फवाऱ्याचे मारे, शेतकऱ्यांना झालेल्या जखमा, वृद्ध महिला शेतकऱ्यांचा बोचऱ्या थंडीत ठिय्या आणि आंदोलनासाठी झालेली गर्दी असे काही फोटो राहुल यांनी कवितेसोबत ट्विट केले आहेत. नव्या कृषी कायद्यांवरुन सुरू असलेलं शेतकऱ्यांचं आंदोलन आता आणखी तीव्र करण्याची तयारी आंदोलन शेतकऱ्यांनी केली आहे. प्रजासत्ताक दिनी अर्थात 26 जानेवारी रोजी दिल्लीच्या सिंघू सीमेवर 'ट्रॅक्टर परेड' काढणार असल्याचं संयुक्त किसान मोर्चाने जाहीर केलं आहे.
शेतकरी आणि सरकारमधील सातवी फेरी देखील निष्फळ; 8 जानेवारीला पुन्हा चर्चा
शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी "8 जानेवारी रोजी सरकारसोबत पुन्हा एकदा बैठक होईल. तिन्ही कृषी कायदे रद्द व एमएसपी या दोन्ही मुद्यांवर आठ जानेवारी रोजी पुन्हा एकदा चर्चा होईल. आम्ही स्पष्ट केलं आहे की, जोपर्यंत कायदे रद्द केले जात नाही, तोपर्यंत घरवापसी करणार नाही" असं म्हटलं आहे. सरकारसोबतच्या आजच्या बैठकीनंतर प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया देताना त्यांनी असं सांगितलं आहे. सप्टेंबरमध्ये संसदेने मंजूर केलेले तीन कृषी कायदे रद्द करावे, या मागणीसाठी शेतकरी संघटना ठाम आहेत. सरकारचे म्हणणे आहे की या कायद्यांमुळे कृषी क्षेत्र सुधारेल आणि शेतकर्यांचे उत्पन्न वाढेल. नवीन कृषी कायद्यांमुळे एमएसपी आणि मंडई व्यवस्था कमकुवत होईल, अशी भीती शेतकरी संघटनांना वाटत आहे.