नवी दिल्ली - कोरोनाच्या संकटात इंधन दरवाढीचा भडका उडाला असून सर्वसामान्यांच्या खिशावर दरवाढीचा भार आला आहे. गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरात वाढ होत आहे. पुन्हा एकदा इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. याच दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress Rahul Gandhi) यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारला (Modi Government) सणसणीत टोला लगावला आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीवरून जोरदार निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी याआधीही कोरोना व्हायरस, लस आणि विविध मुद्द्यांवरून मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. त्यानंतर आता परत एकदा वाढत्या इंधन दरावरून हल्लाबोल केला आहे.
राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "मोदी सरकारच्या विकासाची अशी परिस्थिती आहे की, जर एखाद्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर वाढले नाहीत तर ती जास्त मोठी बातमी होते" असं राहुल यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. याआधी त्यांनी मोदी सरकारवर यावरून सातत्याने टीका केली आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनी या इंधन दरवाढीबद्दल खुलासा केला आहे. जनकल्याणाच्या योजनांमुळे इंधनाचे भाव वाढत असल्याचं म्हटलं आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांनी इंधन दरवाढीबद्दल अनेकदा स्पष्टीकरण दिलं आहे. मात्र आता एका मुलाखतीत त्यांनी दरवाढीचं नवं कारण सांगितलं आहे.
धर्मेंद्र प्रधान यांनी पत्रकारांशी बोलताना "मला मान्य आहे की, इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. पण एका वर्षात कोरोना प्रतिबंधक लसीच्या मात्रांवर 35 हजार कोटींहून अधिक खर्च झाला आहे. गरीबांना आठ महिन्यांचा किराणा मोफत देण्यासाठीच्या प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेवर एक लाख कोटी रुपये खर्च झाले. शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये काही रक्कम पाठवण्यात आली. तसंच तांदूळ आणि गव्हाच्या MSP ची घोषणा करण्यात आली. त्याशिवाय देशात रोजगारासाठी, विकासकामांसाठी पैशांची गरज आहेच. अशावेळी आम्ही पैसे वाचवून ते पैसे लोककल्याणासाठी वापरत आहोत" असं म्हटलं आहे.
राहुल गांधी यांनी इंधन दरवाढीवर केलेल्या टीकेबद्दल जेव्हा प्रधान यांना प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा ते म्हणाले, जर राहुल गांधींना गरीबांची एवढीच काळजी वाटते, तर त्यांनी काँग्रेस शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना आपल्या राज्यातल्या इंधनांचे दर कमी करण्यास सांगावे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. पेट्रोलच्या दराने शंभरी ओलांडल्याने सर्वसामान्यांना याचा फटका सहन करावा लागत आहे. असं असताना एका ठिकाणी पेट्रोल चक्क मोफत देण्यात आल्याची घटना समोर आली आहे. कोरोना लस घेणाऱ्यास या मोफत पेट्रोलचा लाभ मिळत आहे.
झारखंडच्या चायबासा जिल्ह्यातील चक्रधरपूर येथे नागरिकांना कोरोना लसीकरणासाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे. यामुळे लसीकरण केंद्रावर लोकांच्या रांगा लागल्या आहेत. कोरोना लस घेणाऱ्यास एक लीटर पेट्रोल मोफत देण्यात आलं आहे. तसेच लस घेणाऱ्यास लकी ड्रॉ च्या माध्यमातून बक्षीस देखील दिलं जात आहे. नागरिकांमधील कोरोनाची भीती घालवण्यासाठी अशाप्रकारे जनजागृती करण्यात येत आहे. महिला व बालविकास आणि सामाजिक सुरक्षामंत्री जोबा मांझी यांनी सिंघभूमच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या लसीकरण मोहिमेचं उद्धाटन केलं आहे. प्रत्येक नागरिकाने कोरोना लस घेऊन स्वतःला कोरोनापासून सुरक्षित केलं पाहिजे. लसीकरणाबद्दलच्या अफवांकडे लक्ष देऊ नये असं म्हटलं आहे.