नवी दिल्ली - गेल्या कित्येक दिवसांपासून केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर हजारो शेतकरी आंदोलन करत आहेत. विरोधकांनी मोदी सरकारवर यावरून निशाणा साधला आहे. याच दरम्यान काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राजस्थानमधील अजमेर येथे राहुल गांधी यांनी जनतेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. "मोदींनी देशाला भूक, बेरोजगारी व आत्महत्या हे तीन पर्याय दिलेत" असा घणाघात राहुल यांनी यावेळी केला आहे. काँग्रेसने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे.
राजस्थानमधील रुपनगढ येथे राहुल गांधी यांनी किसान महापंचायतीला संबोधित केलं. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅली देखील काढली. राहुल गांधींनी ट्रॅक्टरवर बसून या रॅलीची सुरुवात केली. "कृषी कायदे लागू करणं हे बेरोजगारीचं कारण ठरेल. पंतप्रधान म्हणत आहेत की ते पर्याय देत आहे. हो त्यांनी दिला आहे. भूक, बेरोजगारी आणि आत्महत्या. ते शेतकऱ्यांची चर्चा करू इच्छितात, मात्र ते तोपर्यंत बोलू शकणार नाहीत जोपर्यंत कायदे रद्द होत नाहीत. शेती भारत मातेची आहे. उद्योजकांची नाही" असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
"संपूर्ण कृषी उद्योग दोन मित्रांच्या हाती सुपूर्द करण्याची मोदींची इच्छा"
राहुल गांधी यांनी "संपूर्ण कृषी उद्योग आपल्या दोन मित्रांच्या हाती सुपूर्द करण्याची मोदी यांची इच्छा असल्याचा" आरोप देखील केला आहे. "देशातील 40 टक्के लोक कृषीक्षेत्राशी संबंधित असून त्यामध्ये शेतकरी, लघू आणि मध्यम उद्योजक, व्यापारी आणि कामगार यांचा समावेश आहे. हा संपूर्ण उद्योग आपल्या दोन मित्रांच्या हातात सुपूर्द करण्याची मोदी यांची इच्छा आहे आणि हाच कृषी कायद्यांचा उद्देश आहे" असं राहुल यांनी म्हटलं आहे. याआधी "जवान नाही, शेतकरीही नाही, मोदी सरकारसाठी 3-4 उद्योजक मित्रच देव आहेत" असं म्हणत राहुल यांनी जोरदार टीका केली होती.
"जवान नाही, शेतकरीही नाही, मोदी सरकारसाठी 3-4 उद्योजक मित्रच देव", राहुल गांधींचा घणाघात
अर्थसंकल्पात सैनिकांच्या पेन्शन कपातीच्या मुद्द्यावरून राहुल गांधींनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला होता. राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्रीय अर्थसंकल्पावरून मोदी सरकारवर निशाणा साधला होता. हा अर्थसंकल्प शेतकरी व जवानांच्या हिताचा नसून फक्त उद्योजकांच्या फायद्याचा असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली. राहुल यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं होतं. "अर्थसंकल्पात सैनिकांच्या पेन्शनमध्ये कपात. जवानही नाही, शेतकरीही नाही मोदी सरकारसाठी तीन-चार उद्योजक मित्रच देव आहेत" असं राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं.
"मोदी असो किंवा मनमोहन सिंग, राहुल गांधींकडून पंतप्रधानांचा अपमान"; अर्थमंत्री संतापल्या
अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी लोकसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. याच दरम्यान सीतारामन यांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. अर्थमंत्र्यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या 'हम दो हमारे दो' विधानावरून सणसणीत टोला लगावला आहे. राहुल गांधी यांनी नेहमीच पंतप्रधानांचा अपमान केला आहे. मग ते सद्य पंतप्रधान नरेंद्र मोदी असो किंवा माजी पंतप्रधान मनमोहन सिंग.. माजी पंतप्रधान परदेशात गेले असताना राहुल गांधींनी त्यांच्याकडून आणण्यात आलेला अध्यादेश फाडून फेकून दिला होता, असंही निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे.