मुंबई - काँग्रेसचे युवा नेते आणि राज्यसभा खासदार राजीव सातव यांचे पुण्यातील जहाँगीर हॉस्पिटलमध्ये निधन झालं. नुकतेच ते कोरोनातून बरे झाले होते. परंतु त्यानंतर ते सायटोमेगँलो व्हायरस या आजाराच्या विळख्यात अडकले. शुक्रवारपासून राजीव सातव यांची तब्येत खालावत होती. अखेर रविवारी पहाटे राजीव सातव यांचे निधन झाल्याची दु:खद बातमी समोर आली.
राजीव सातव यांच्या निधनानं काँग्रेसची मोठी हानी झाली आहे. खुद्द पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी(Rahul Gandhi) यांनीही माझा मित्र गमावला, आपलं मोठं नुकसान झालं अशा शब्दात त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. अत्यल्प काळात राजीव सातव यांनी राष्ट्रीय राजकारणात ठसा उमटवला होता. २००९ च्या कळमनुरी मतदारसंघातून आमदार ते हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार त्यानंतर राज्यसभा खासदार असं लोकप्रतिनिधित्व केले आहे. त्याचसोबत पक्षामध्ये युवक काँग्रेस अध्यक्ष हिरारीने सांभाळलं आहे.
राजीव सातव यांची ही कामगिरी पाहता ते राहुल गांधींच्या अत्यंत विश्वासू शिलेदारांमध्ये जाऊन बसले. पंतप्रधान नरेद्र मोदी(PM Narendra Modi) आणि केंद्रीय मंत्री अमित शहा(Amit Shah) यांच्या होम पिचवर गुजरातमध्ये २०१७ मध्ये विधानसभेची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत काँग्रेसने प्रभारी म्हणून राजीव सातव यांच्यावर जबाबदारी सोपवली. या निवडणुकीच्या निमित्ताने राजीव सातव यांचे पक्षीय संघटन कौशल्य कामाला आले. अक्षरश: गुजरात विधानसभा निवडणुकीत राजीव सातव यांच्या रणनीतीने भाजपाला जेरीस आणलं होतं.
२०१७ च्या गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला दोन आकडी जागा मिळतील का नाही याबाबत शंका उपस्थित केली जात होती. या निवडणुकीत अमित शहा आणि नरेंद्र मोदींनी काँग्रेसची खिल्ली उडवली. गुजरात हा भाजपाचा गड मानला जातो. याठिकाणी भाजपाची सत्ता आहे. भाजपाला पूरक असं वातावरण गुजरातमध्ये आहे. त्यामुळे भाजपा विधानसभा निवडणुकीत सत्ता पुन्हा मिळवणार हे सर्वांनाच माहिती होते. परंतु २०१७ च्या निवडणुकीत सत्ता काय ठेवण्यासाठी भाजपाची दमछाक झाल्याचं दिसून आलं होतं.
२०१७ च्या निवडणुकीत भाजपाला ९९ जागा मिळाल्या होत्या तर काँग्रेसला अनपेक्षितपणे ८० जागा मिळाल्या होत्या. तर अन्य ३ उमेदवार विजयी झाले होते. या निवडणुकीत राजीव सातव यांनी केलेल्या कामगिरीचं कौतुक सगळेच करतात. कारण २०१२ च्या गुजरात निवडणुकीत भाजपाला ११९ जागा तर काँग्रेसला अवघ्या ५७ जागा मिळाल्या होत्या. नरेंद्र मोदी लाट असतानाही खुद्द पंतप्रधान मोदींच्या होमपिचवर काँग्रेसच्या शिलेदाराने भाजपाला घाम फोडला होता.