वर्ध्यात काँग्रेसला गटबाजीचे ग्रहण; तडस यांची उमेदवारी निश्चित
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2019 04:47 AM2019-03-12T04:47:12+5:302019-03-12T04:47:30+5:30
गेल्या साडेचार वर्षांच्या काळात जिल्हा परिषद, नगर पालिकांपासून ते ग्रामपंचायतीपर्यंत भाजपने मुसंडी मारली.
- अभिनय खोपडे
वर्धा लोकसभा मतदार संघात गेल्या वेळी काँग्रेस उमेदवार सागर मेघे यांचा पराभव करून भाजपाचे रामदास तडस निवडून आले होते. गेल्या साडेचार वर्षांच्या काळात जिल्हा परिषद, नगर पालिकांपासून ते ग्रामपंचायतीपर्यंत भाजपने मुसंडी मारली. या मतदारसंघात काँग्रेसचे तीन व भाजपचे तीन आमदार आहेत. मात्र काँग्रेसमध्ये प्रचंड गटबाजी असून, दस्तुरखुद्द राहुल गांधी यांच्या सभेनंतरही पक्षातील गटबाजी थांबलेली नाही. काँग्रेसकडून चारुलता खजानसिंग टोकस, शैलेश अग्रवाल या दोघांनी उमेदवारी मागितली आहे. टोकस या माजी मंत्री दिवंगत प्रभा राव यांच्या कन्या आहेत. सध्या त्या दिल्लीनजीकच्या गुडगाव येथे राहतात. गेल्या वेळी दत्ता मेघे यांच्यासारखे बलाढ्य नेतृत्व काँग्रेस पक्षाकडे होते. आता मेघे पिता-पुत्र भाजपवासी झाले आहेत. भाजपकडून विद्यमान खासदार रामदास तडस पुन्हा उमेदवार राहतील, अशी दाट शक्यता आहे. सागर मेघे यांचेही नाव उमेदवारीसाठी चर्चेत आहे.
सिंदी येथील ड्रायपोर्ट, वर्धा-यवतमाळ-नांदेड हा रेल्वे व नागपूर-मुंबई या समृद्धी महामार्ग प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. मात्र शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नसल्याने ग्रामीण भागात भाजपविषयी नाराजी आहे. काँग्रेस-भाजपशिवाय या मतदारसंघात मागील दीड वर्षापासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते हेही कामाला लागले आहेत. त्यांनी या मतदारसंघावर दावा केला आहे. काँग्रेस-राकाँ आघाडीत हा मतदारसंघ स्वाभिमानला सोडण्याबाबत हालचाली सुरू आहे. याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. काँग्रेसच्या दिल्लीस्थित नेत्यांकडे उमेदवारीसाठी नवखे असलेले शैलेश अग्रवाल ठाण मांडून आहेत.
हिंदीभाषिक मतदार या मतदारसंघात तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यामुळे ते उमेदवारीसाठी दावेदारी करीत आहेत. यापूर्वी चारदा या मतदार संघातून हिंदीभाषिक खासदार निवडून गेले आहेत. याव्यतिरिक्त बहुजन समाज पार्टी, वंचित बहुजन आघाडी आदींचेही उमेदवार रिंगणार राहणार आहेत. मात्र, खरा सामना भाजप व काँग्रेस आघाडीच्या उमेदवारातच होईल, हे निश्चित!
वर्धा मतदार
एकूण मतदार- 17,95,495
पुरुष- 8,83,887
महिला- 8,38,493
सध्याची परिस्थिती
जिल्ह्यातील आठ नगरपालिका-पंचायतीत १०४ सदस्य असून, भाजपचे ५८, कॉँग्रेसचे ३०, राष्टÑवादीचे ६, सेनेचे ४ व इतर ६ सदस्य आहेत. सर्वच पालिकांवर भाजपची सत्ता आहे.
जिल्हा परिषदेवरही भाजपची एकहाती सत्ता असून, ५२ पैकी ३१ सदस्य भाजपचे आहेत. तर १३ कॉँग्रेस, दोन राकॉँ, सेना दोन व अन्य चार सदस्य आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही अनेक गट आहेत. जिल्हा सहकारी बँक डबघाईस आल्याने याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. भाजपने या बँकेला नवसंजीवनी देण्याचे काम केले. त्यामुळे बँकेचे राज्य सहकारी बँकेत विलिनीकरण होणार आहे. हाही निवडणुकीतील महत्त्वाचा मुद्दा आहे. भाजपकडे दत्ता मेघे यांची शक्ती वाढल्याने, या मतदार संघात काँग्रेससमोर तगडे आव्हान भाजपचे आहे.
२०१४ मध्ये मिळालेली मते
रामदास तडस (भाजप)- 5,37,518
सागर मेघे (काँग्रेस)- 2,15,783
चेतन पेंदाम (बसप)- 90,866
मो. अलीम पटेल (आप)- 15,719
श्रीकृष्ण चंपत उबाळे (अपक्ष)- 6,394