नवसंजीवनी देणाऱ्या विदर्भावर काँग्रेसची मदार, इंदिरा गांधी यांनाही दिली होती साथ
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2021 07:44 AM2021-02-06T07:44:04+5:302021-02-06T07:45:31+5:30
Congress News : पडत्या काळात संजीवनी देणाऱ्या विदर्भावर पुन्हा एकदा काँग्रेसने फोकस केला आहे. महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी यवतमाळच्या संध्या सव्वालाखे यांची वर्णी लागल्यानंतर आता प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नागपूर - पडत्या काळात संजीवनी देणाऱ्या विदर्भावर पुन्हा एकदा काँग्रेसने फोकस केला आहे. महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी यवतमाळच्या संध्या सव्वालाखे यांची वर्णी लागल्यानंतर आता प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विदर्भाने ज्यावेळी काँग्रेसला भरीव साथ दिली त्याच वेळी काँग्रेसला राज्याच्या सत्तेची चावी मिळाली. ही बाब हेरून काँग्रेस श्रेष्ठींनी विदर्भातून भविष्यातील सत्तेचा मार्ग सुकर करण्याची रणनीती आखली आहे.
यापूर्वी आबासाहेब खेडकर, नाशिकराव तिरपुडे, रणजित देशमुख, प्रभा राव, माणिकराव ठाकरे या विदर्भातील नेत्यांनी प्रदेश काँग्रेसचे यशस्वीपणे नेतृत्व केले. त्याचा फायदाही काँग्रेसला वेळोवेळी झाला. आणीबाणीनंतर इंदिरा गांधी यांनाही विदर्भानेच साथ दिली होती. २०१४ मध्ये विदर्भातून काँग्रेसला ६२ पैकी फक्त १० जागा मिळाल्या होत्या. काँग्रेस सत्तेतून बाहेर गेली. मात्र, २०१९ मध्ये त्यात काहीशी वाढ झाली व १६ जागा निवडून आल्याने काँग्रेसचे संख्याबळ वाढले. एवढेच नव्हे तर गेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यातून काँग्रेसचे एकमेव खा. बाळू धानोरकर हे चंद्रपूर लोकसभेतून विजयी झाले. पटोले यांच्या नियुक्तीने काँग्रेसला संकटात पाठबळ देणाऱ्या विदर्भाचा इतिहास पुन्हा एकदा चर्चेेत आला आहे.
फडणवीसांना रोखण्यासाठी रणनीती
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्यातील भाजपचा मुख्य चेहरा आहेत. फडणवीसांची राज्यभरातील घोडदौड थांबवायची असेल तर त्यांना अधिकवेळ विदर्भात गुंतवून ठेवणे आवश्यक आहे. विदर्भाला झुकते माप देण्यामागे काँग्रेसची हीदेखील रणनीती आहे.
विदर्भातूनच सत्तेचा मार्ग
विदर्भात विधानसभेच्या ६२ जागा आहेत. पैकी ३५ ते ४० जागा जिंकल्या तरच इतर विभागांच्या पुरवठ्याने काँग्रेस ८० पर्यंत मजल मारू शकते, असा काँग्रेसमधील धुरिणांचा अंदाज आहे.