नवी दिल्ली - कोरोनाच्या संकटात इंधन दरवाढीचा भडका उडाला असून सर्वसामान्यांच्या खिशावर दरवाढीचा भार आला आहे. गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरात वाढ होत आहे. पुन्हा एकदा इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. दिल्ली, पश्चिम बंगाल, राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, जम्मू-कश्मीर, ओडिशा, तामिळनाडू, केरळ, बिहार, पंजाब, लद्दाख आणि सिक्किममध्ये पेट्रोलच्या दराने शंभरी पार केली आहे. याच दरम्यान काँग्रेसचे नेते सचिन पायलट (Congress Sachin Pilot) यांनी मोदी सरकारवर (Modi Government) जोरदार हल्लाबोल केला आहे. "आजच्या काळात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती तर शुद्ध देशी तुपापेक्षाही जास्त झाल्या आहेत" अशा शब्दांत पायलट यांनी सणसणीत टोला लगावला आहे.
सचिन पायलट यांनी गेल्या 6 महिन्यांत देशात पेट्रोलच्या किंमती जवळपास 66 वेळा वाढल्या आहेत असं म्हणत मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. "सध्याच्या काळात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ झाल्यावर सर्वच गोष्टी महाग होत आहेत आणि त्याचा थेट परिणाम हा सर्वसामान्यांच्या आर्थिक गणितावर होतो आहे. आजच्या काळात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती तर शुद्ध देशी तुपापेक्षाही जास्त झाल्या आहेत" अशा शब्दांत पायलट यांनी टीकास्त्र सोडलं आहे. पेट्रोलच्या किंमती सातत्याने वाढत असून अनेक ठिकाणी दराने शंभरी पार केली आहे. पेट्रोल दरवाढीचा महागाईवर परिणाम होत असल्याचं देखील पायलट यांनी सांगितलं आहे.
"देशात मोठ्या प्रमाणावर महागाई वाढली आहे. यामुळे अनेक कुटुंबांना पुरेसं अन्न देखील मिळत नाही. फक्त पेट्रोलचाच विचार करायचा झाला, तर अनेक राज्यांमध्ये पेट्रलच्या किंमतींनी शंभरी गाठली आहे. गेल्या 6 महिन्यांत देशात पेट्रोलच्या किंमती जवळपास 66 वेळा वाढल्या आहेत. यावरूनच केंद्राचं महागाई कमी करण्यापेक्षा महागाई वाढवण्याचंच धोरण असल्याचं दिसून येत आहे" असं सचिन पायलट यांनी म्हटलं आहे. डेहराडूनमध्ये काँग्रेस नेते आणि पदाधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये मोदी सरकारवर निशाणा साधला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
"तुमची गाडी पेट्रोल-डिझेलवर चालत असेल पण मोदी सरकार कर वसुलीवर चालतं"
इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress Rahul Gandhi) यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारला (Modi Government) सणसणीत टोला लगावला आहे. राहुल गांधी यांनी याआधीही कोरोना व्हायरस, लस आणि विविध मुद्द्यांवरून मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं. त्यानंतर वाढत्या इंधन दरावरून हल्लाबोल केला. "तुमची गाडी पेट्रोल-डिझेलवर चालत असेल पण मोदी सरकार कर वसुलीवर चालतं" अशा शब्दांत राहुल यांनी बोचरी टीका केली. ट्विटरवरून याबाबत ट्विट केलं होतं.