मुंबई - काँग्रेसचे टूलकिट खलिस्तान्यांच्या टूलकिटपेक्षा (Toolkit) खतरनाक असल्याची टीका भाजपाकडून करण्यात आली आहे. भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर (BJP Atul Bhatkhalkar) यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. काँग्रेसचे टूलकिट खलिस्तान्यांच्या टूलकिटपेक्षा कमी खतरनाक नाही. ‘इंडियन व्हायरस, मोदी व्हायरस, असे शब्द सोशल मीडियातून व्हायरल करा’, असे आदेश काँग्रेस कार्यकर्त्यांना दिले आहेत. सत्तेसाठी काँग्रेस देशद्रोह्यांना पुढे करू शकते वेळ आल्यास देशद्रोहही करू शकते, असा दावा अतुल भातखळकर यांनी आपल्या ट्विटमध्ये केला आहे. यानंतर आता काँग्रेस नेत्यांकडून भाजपावर जोरदार पलटवार करण्यात आला आहे.
काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत (Congress Sachin Sawant) यांनी भाजपाला प्रत्युत्तर दिलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून जोरदार निशाणा साधला आहे. "भाजपा अत्यंत खोटारडा, विखारी व कांगावाखोर पक्ष" असं म्हणत टीका केली आहे. "भाजपा अत्यंत खोटारडा, विखारी व कांगावाखोर पक्ष आहे. सदर टूलकिट हे बनावट आहे. काँग्रेसकडून जे. पी. नड्डा आणि संबित पात्रा यांच्यावर गुन्हा दाखल केला जाणार आहे. त्यात अतुल भातखळकर यांचंही नाव देऊ. मोदींची कोविड हाताळण्यातील अपयशाने डागळलेली प्रतिमा सावरण्यासाठी हा बनाव भाजपाने रचला आहे" अशा शब्दांत सचिन सावंत यांनी भाजपावर हल्लाबोल केला आहे.
टुलकिटवरून आता पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहे. काँग्रेसचे टूलकिट खलिस्तान्यांच्या टूलकिटपेक्षा खतरनाक असल्याची टीका भाजपाकडून करण्यात आली आहे. एकीकडे कोरोनाचे संकट देशावर अद्यापही कायम असताना, दुसरीकडे भाजपा प्रवक्ते संबित पात्रा यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसवर आरोप केले आहेत. संकटातही काँग्रेस राजकारण करत असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी काँग्रेसने एक टूलकिट तयार केले असल्याचे संबित पात्रा म्हणाले. यानंतर आता काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी (Congress Priyanka Gandhi) यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.
"खोटी माहिती पसरवण्यात वेळ घालवू नका, जागे व्हा आणि लोकांचे जीव वाचवायला सुरुवात करा"
प्रियंका गांधी यांनी खोटी माहिती पसरवू नका असं म्हणत जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. प्रियंका यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "खोटी माहिती पसरवण्यात वेळ घालवू नका. जागे व्हा आणि लोकांचे जीव वाचवायला सुरुवात करा" असं ट्विट केलं आहे. तसेच हे टूलकिट फेक असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. टूलकिटचा फोटो त्यांनी शेअर केला आहे. त्यावर फेक असा उल्लेख करण्यात आला आहे. टूलकिट प्रकरणी भाजप आणि काँग्रेसमध्ये जोरदार वाद रंगला आहे.