मुंबई – काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी भाजपा आमदार राम कदम यांनी केलेल्या टीकेचा चांगलाच समाचार घेतला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा छठपुजेला शासनाने बंदी घातली आहे. त्यामुळे भाजपा आमदार राम कदम यांनी महाविकास आघाडी सरकारवर हिंदूविरोधी असल्याचं टीकास्त्र सोडलं, मात्र याच टीकेवरुन सचिन सावंत यांनी राम कदम यांना चिमटा काढला आहे.
आमदार राम कदम म्हणाले होते की, रावणराज चालवणाऱ्या महाविकास आघाडी सरकारनं हिंदू धर्माच्या उत्सवांना विरोध करणं बंद कधी करणार? अन्य धर्माच्या उत्सवांना तात्काळ परवानगी दिली जाते परंतु हिंदू धर्मासाठी का नाही? महाविकास आघाडी सरकारचे निर्णय इटलीवरुन होतात का? छठपूजेला सरकारने परवानगी द्यावी असा इशारा त्यांनी दिला होता, यावर यालाच म्हणतात स्वत:च्या हाताने तोंडाला काळं फासणं, भाजपा नेत्यांना हेदेखील माहिती नाही भाजपा शासित राज्यांमध्ये छठपूजेवर बंदी घालण्यात आली आहे. तर आरएसएस इटलीहून स्थापित झाली होते ऐतिहासिक सत्य आहे अशा शब्दात काँग्रेसच्या सचिन सावंत यांनी राम कदमांचा समाचार घेतला.
त्याचसोबत एप्रिल २०२० मध्ये पालघरमधील गडचिंचले गावात साधूंच्या मॉबलिंचिंग प्रकरणात अद्यापपर्यंत २२५ अटक झाल्या आहेत. १५४ हत्याप्रकरणी व ७५ जमावबंदी आदेशाचे उल्लंघन प्रकरणी! निष्काळजीपणा दाखविल्याबद्दल पोलीसांवरही कारवाई करण्यात आली. सदर तपास सीआयडीकडे आहे व न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. असं असताना सात महिन्यांनी पुन्हा भाजपा यावर राजकारण करत आहे असं सचिन सावंत म्हणाले.
दरम्यान, सदर गडचिंचले गाव हा भाजपाचा गड आहे. गेले दहा वर्षे भाजपा चा सरपंच आहे. आरोपी क्र. ६१ व ६५ यांच्या समवेत बहुसंख्य अटक झालेले आरोपी हे भाजपाचे आहेत. भाजपाच्या संबंधित आरोपींना वाचवण्यासाठीच सीबीआय चौकशी मागितली जात आहे. देशपातळीवर भाजपा राज्यात साधूंच्या हत्या झाल्या. उत्तर प्रदेश मध्ये तसेच कर्नाटक मध्ये तीन पुजारींच्या हत्या झाली. तेथे मात्र ही भाजपाची मंडळी गप्प बसतात. भाजपाचा दांभिकपणा व धर्माचा राजकारणासाठी उपयोग करण्याची हीन मानसिकता निषेधार्ह आहे. भाजपाच्या गलिच्छ राजकारणाचा जाहीर निषेध अशी टीका सचिन सावंतांनी आमदार राम कदमांवर केली आहे.
काय म्हणाले होते राम कदम?
महाराष्ट्र सरकार धुतराष्ट्राच्या भूमिकेत आहे, पालघरमध्ये साधुंच्या हत्येला इतके दिवस झाले तरी कारवाई नाही, हत्येवेळी राष्ट्रवादीचे काही नेते उपस्थित होते, घटनेच्या चौकशीआधीच महाराष्ट्र सरकारने मॉब लिचिंग असल्याचं सांगून टाकलं, सरकारला हा तपास सीबीआयला सोपवावा लागेल. महाराष्ट्राची भूमी संताची आहे, याठिकाणी संतांवर अन्याय सहन करणार नाही. हे सरकारने लक्षात ठेवावं असा इशारा राम कदम यांनी दिला होता.