नवी दिल्ली - उत्तराखंडमधील हरिद्वार येथे कुंभमेळ्याचे (Kumbh Mela) आयोजन करण्यात आले आहे. मात्र आता या कुंभमेळ्यात झालेल्या लाखो भाविकांच्या गर्दीमुळे हजारो जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर येत आहे. अनेक साधु-संतांसह भाविकांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. कुंभमेळ्यामुळे निर्माण झालेल्या संसर्गाच्या संकटाची गंभीर दखल घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही (Narendra Modi ) मोठे विधान केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी याबाबत म्हणाले की, मी संतमंडळींना आवाहन केले आहे की, आता कुंभमेळ्यातील दोन शाही स्नान पूर्ण झाले आहेत. आता कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे कुंभमेळा प्रतीकात्मक रूपातच साजरा करावा. त्यामुळे कोरोनाविरोधातील लढाईला बळ मिळेल.
पंतप्रधान मोदींनी केलेल्या या आवाहनानंतर काँग्रेसने मोदी सरकारला सणसणीत टोला लगावला आहे. "…हेच जर दुसरं कोणी केलं असतं तर त्यांना हिंदूद्रोही ठरवलं असतं" असं म्हणत निशाणा साधला आहे. काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "बरं झालं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुंभमेळा समाप्त करण्याचं आवाहन केलं. हेच जर दुसरं कोणी केलं असतं, तर त्याला हिंदूद्रोही ठरवलं असतं. कालपर्यंत 49 लाख लोकांनी स्नान केलं आहे. कोलकातापर्यंत जाणारी गंगा किती कोरोना घेऊन कुठपर्यंत जाईल, याची माहिती नाही" असं निरुपम यांनी म्हटलं आहे.
कुंभमेळ्यामुळे कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढले, गंभीर दखल घेत मोदींनी संतांना असे आवाहन केले
संजय निरुपम यांनी "कुंभमेळा तत्काळ समाप्त करायला हवा" असं आवाहन देखील स्वामी अवधेशानंद गिरी यांना केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी याबाबत म्हणाले की, मी आचार्य महामंडलेश्वर पूज्य स्वामी अवधेशानंद गिरी यांच्याशी फोनवरून चर्चा केली. सर्व संतांच्या प्रकृतीची माहिती घेतली. सर्व संतमंडळी प्रशासनाला हरप्रकारे मदत करत आहेत. मी यासाठी संतमंडळींचे आभार मानतो. मी संतमंडळींना आवाहन केले आहे की, आता कुंभमेळ्यातील दोन शाही स्नान पूर्ण झाले आहेत. आता कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे कुंभमेळा प्रतीकात्मक रूपातच साजरा करावा. त्यामुळे कोरोनाविरोधातील लढाईला बळ मिळेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाबाबत प्रतिक्रिया देताना महामंडलेश्वर अवधेशानंद गिरी यांनी सांगितले की, माननीय पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनाचा आम्ही सन्मान करतो. स्वत:च्या आणि इतरांच्या जीविताचे रक्षण करणे हे महापुण्याचे काम आहे. त्यामुळे कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन धर्मपरायण जनतेने नियमांचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले. उत्तराखंडमधील हरिद्वार येथे सुरू असलेला कुंभमेळ्याची समाप्ती 27 एप्रिल रोजी होणार आहे. वाढत्या कोरोनामुळे कुंभमेळा वेळेआधीच समाप्त केला जाईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र कुंभमेळा वेळेपूर्वीच संपवण्याची कुठलीही योजना नसल्याचे उत्तराखंड सरकारने स्पष्ट केल्याने आता कुंभमेळा नियोजित कार्यक्रमाप्रमाणे आयोजित होईल हे स्पष्ट झाले आहे.