मुंबई : दिल्लीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सर्व विरोधकांशी भेटीगाठी सुरू केल्यानंतर महाराष्ट्रात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाची भाषा सोडून दिली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आता पक्ष संघटना मजबूत करा, असे आवाहन त्यांनी केले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी पक्ष संघटना बळकट करा. या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला घवघवीत यश मिळेल यासाठी कामाला लागा, असे आवाहन पटोले यांनी केले आहे. (Congress state president Nana Patole Says, Strengthen party organization now in local body elections)
टिळक भवन येथे जिल्हा अध्यक्ष, आमदार, सर्व सेल व विभाग प्रमुखांच्या बैठकीला मार्गदर्शन करताना पटोले म्हणाले, महाविकास आघाडीचे सरकार जनतेच्या पसंतीला उतरले असून सरकारची कामे जनतेपर्यंत पोहचवा. नव्या उत्साहाने व ताकदीने कामाला लागा.या बैठकीला माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, मुंबई काँग्रेस अध्यक्ष आमदार भाई जगताप, प्रदेश कार्याध्यक्ष शिवाजीराव मोघे, चंद्रकांत हंडोरे, नसीम खान, प्रणिती शिंदे, आमदार शरद रणपिसे, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे आदी उपस्थित होते.
अशोक शिंदे यांचा कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेशमाजी राज्यमंत्री व वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार अशोक शिंदे यांनी टिळक भवन येथे झालेल्या एका कार्यक्रमात कार्यकर्त्यांसह काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला.