मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे(NCP Eknath Khadse) यांच्यावरील चौकशीचा झोटिंग समितीचा अहवाल मंत्रालयातून गायब झाल्यानंतर विरोधकांनी सत्ताधारी महाविकास आघाडीवर तोंडसुख घेतले. गहाळ झालेला हा अहवाल पुन्हा मिळाल्यानंतर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले(Congress Nana Patole) यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला आहे. फडणवीस सरकारच्या काळातील अनेक चिठ्ठे बाहेर आले तर देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे इतर सहकारी अडचणीत येतील असा गौप्यस्फोट पटोलेंनी केल्यानं खळबळ माजली आहे.
नाना पटोले माध्यमांशी बोलले की, देवेंद्र फडणवीस(BJP Devendra Fadnavis) यांनी भाजपातील अनेक बहुजन नेत्यांचे खच्चीकरण केले हे सर्वांनाच माहिती आहे. खडसेंचे तर राजकीय नुकसान करण्याचा प्रयत्न झाला. झोटिंग समितीचा अहवाल अद्याप वाचला नाही परंतु तो पुढे येईल तेव्हा त्यातील फार्स कळून येतील. मागील सरकारच्या काळातील अनेक चिठ्ठे बाहेर आले तर फडणवीस आणि तत्कालीन मंत्री गोत्यात येतील असा दावा त्यांनी केला आहे.
महाराष्ट्राचा नेता राष्ट्रपती झाला तर आनंदच...
आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार(Sharad Pawar) यांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार करण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यावरून महाराष्ट्राचा नेता राष्ट्रपती होत असेल तर आनंदच होईल. केंद्रीय पातळीवर राष्ट्रपती प्रक्रियेबाबत काही सुरूवात झाली की नाही माहिती नाही असंही नानांनी स्पष्ट केले.
पक्षप्रमुख म्हणून बोलणे हे काम आहे
महाविकास आघाडीमध्ये एकमत आहे. माझे वाक्य तोडून मोडून दाखवले. मी काही चुकीचे बोललो नाही. पक्षप्रमुख म्हणून बोलणे हे काम आहे. कार्यकर्त्याचे गाऱ्हाणे ऐकणे माझे काम आहे, असे सांगत पण मला विरोध का होतो, हे माहिती नाही. महाराष्ट्र काँग्रेसमध्ये सर्व सुरळीत सुरु आहे, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीसांनी नेमलेल्या झोटिंग समितीचा अहवाल हा २०१७ मध्येच आला होता. मात्र, हा अहवाल समोर आणण्यात आला नाही. झोटिंग समितीवर ४५ लाख रुपये खर्च करण्यात आला होता. तसेच एक वर्षाचा वेळ लागला होता. या समितीसमोर खडसे हजर राहिले होते. दुसरीकडे, एकनाथ खडसे यांनी विधानसभेच्या अखेरच्या दिवशी विधानसभेत हा अहवाल सादर करण्याची मागणी केली होती.