काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा भाजपाला इशारा; “महाराष्ट्रात ‘ऑपरेशन लोटस’ झाल्यास...”
By प्रविण मरगळे | Updated: February 9, 2021 08:59 IST2021-02-09T08:57:19+5:302021-02-09T08:59:09+5:30
Nana Patole Target Devendra Fadnavis: काँग्रेस-राष्ट्रवादीचे आमदार फुटले जाण्याची चर्चा आहे, परंतु भाजपाने स्वत:चे आमदार सांभाळावे, जी काही रणनीती असेल ती करावी

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा भाजपाला इशारा; “महाराष्ट्रात ‘ऑपरेशन लोटस’ झाल्यास...”
मुंबई – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आल्यानंतर राज्यात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. जास्त दिवस विरोधी पक्षात राहायचं नाही असं विधान माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले होते, या विधानावरून काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी फडणवीसांना समाचार घेतला आहे.
पत्रकारांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, देवेंद्र फडणवीस आमचे मित्र आहेत, ते फक्त बोलण्यात एक्सपर्ट आहेत, मी भविष्यकार नाही, ते जास्त पाहतात. पण महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस झाल्यास महाराष्टातून भाजपा संपुष्टात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे. तसेच शिवसेना-भाजपा यांच्यात बंद खोलीत जे झालं त्याबद्दल बोलणार नाही. मात्र सव्वा वर्ष झाली आणि अमित शहा आज बोलतायेत, शेतकरी, महागाई, बेरोजगारी असे विविध प्रश्न आहेत, त्यावरून लोकांना विचलित करण्याचं काम भाजपा नेहमी करतात. सत्तेत बसणाऱ्यांनी देशासमोर जे प्रश्न आहेत त्याकडे लक्ष द्यावे असं पटोलेंनी सांगितले. (Congress Nana Patole Criticized BJP Devendra Fadnavis)
पंतप्रधान, गृहमंत्री खोटं बोलतात
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना नरेंद्र मोदींनी राज्यसभेत जे सांगितलं त्याने आश्चर्य वाटलं, मन की बात सारखं संसदेत भाषण करतात, जीएसटी कायद्याला भाजपाने विरोध केला होता, मात्र त्यांच्या फायद्याचं आहे अशाप्रकारे जीएसटी कायदा आणला. काही लोकांच्या फायद्यासाठी कृषी कायदा आणला आहे. शेती प्रश्नाची ज्यांना ABC माहिती नाही अशा रेल्वे मंत्र्यांना शेतकऱ्यांसोबत चर्चा करायला लावणं हा विश्वासघात आहे. पंतप्रधान, गृहमंत्री खोटं बोलतात हे जनतेला माहिती आहे. शेतकऱ्यांना सभागृहातून आवाहन करण्यापेक्षा स्वत: तुम्ही चर्चेला जावं असं नाना पटोले म्हणाले.
अंडरवर्ल्डसारखं भाजपा काम करतेय
एकेकाळी अंडरवर्ल्डची दहशत होती, दबावात आणून ते सेलिब्रिटीला हवं तसं वागायला लावत होते, मात्र आज भाजपा सरकार अंडरवर्ल्ड सारखं काम करत आहे, मूळ मुद्दयावरून लक्ष हटवण्यासाठी सेलिब्रिटींना ट्विट करायला लावलं, पण कोणत्याही दबावाला झुकून सेलिब्रिटींनी अशाप्रकारे ट्विट करणं योग्य नाही. देश त्यांच्याकडे आयकॉन म्हणून पाहतो, त्यांनी मर्यादेत राहावं असंही पटोलेंनी सांगितले.
विधानसभा अध्यक्षपदाची बिनविरोध परंपरा कायम राहावी
आगामी काळात होणाऱ्या विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध व्हायला हवी, मात्र यासाठी भाजपा रणनीती आखत आहे, काँग्रेस-राष्ट्रवादीचे आमदार फुटले जाण्याची चर्चा आहे, परंतु भाजपाने स्वत:चे आमदार सांभाळावे, जी काही रणनीती असेल ती करावी, परंतु विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीची बिनविरोध परंपरा कायम राहावी असं विधान नाना पटोलेंनी केले.
उपमुख्यमंत्रिपदाची मागणी नाही
काँग्रेस उपमुख्यमंत्रिपद मागत नाही, ओबीसी नेते उपमुख्यमंत्रिपदासाठी इच्छुक नाहीत, ही जनतेची मागणी असेल तर त्याला पक्ष म्हणून आम्ही रोखू शकत नाही. महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करताना जो किमान समान कार्यक्रम ठरला त्यानुसार सरकार पुढे वाटचाल करेल असं सांगत नाना पटोलेंनी विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहील हे स्पष्ट केले आहे.