काँग्रेसची एक एक रुपया वाचविण्यासाठी धडपड, पदाधिकाऱ्यांना खर्च कमी करण्याची सूचना
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2021 05:37 AM2021-08-15T05:37:45+5:302021-08-15T05:37:57+5:30
Congress : काँग्रेसने खर्चात बचत व निधी जमा करण्यासाठी उपायही योजले आहेत. या पक्षाचे खजिनदार पवनकुमार बन्सल यांनी सांगितले की, पक्षाने खर्चात बचत करायचे ठरविले आहे.
नवी दिल्ली : देशातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला विविध कंपन्यांकडून तसेच व्यक्तींकडून मिळणाऱ्या देणग्यांचा ओघ खूप आटल्यामुळे त्या पक्षासमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. त्यामुळे काँग्रेसच्या खासदारांनी पक्षाकडून पैसे घेण्याएवजी त्यांना देण्यात येणाऱ्या विमान वाहतूक सुविधेचा लाभ घेण्याचा आग्रह पक्षश्रेष्ठींनी केला आहे. तसेच खासदारांनी दरवर्षी पक्षाला ५० हजार रुपये देण्यास सांगण्यात आले आहे.
काँग्रेसने खर्चात बचत व निधी जमा करण्यासाठी उपायही योजले आहेत. या पक्षाचे खजिनदार पवनकुमार बन्सल यांनी सांगितले की, पक्षाने खर्चात बचत करायचे ठरविले आहे. खासदार व सरचिटणीसांनी विमान प्रवासाचा लाभ घ्यावा, सचिवांनी रेल्वे प्रवास करावा असे सांगण्यात आले आहे. सचिवांना १४०० किमी प्रवास करण्यासाठी रेल्वेचे भाडे दिले जाईल. विमान वाहतुकीचा खर्च महिन्यातून दोनदा देण्यात येईल. स्टेशनरी, वर्तमानपत्र, वीज यांवरील खर्चात कपात करण्यास काँग्रेस पदाधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे. काँग्रेस समर्थकांकडून दरवर्षाला प्रत्येकी चार हजार रुपये पक्षनिधीसाठी मागितले जातील.
भाजपला सर्वाधिक देणग्या
२०१९-२० या आर्थिक वर्षात देशातील राजकीय पक्षांना मिळालेल्या देणग्यांपैकी ७६ टक्के देणग्या एकट्या भाजपला मिळाल्या आहेत. या वर्षात काँग्रेसला देणगीस्वरूपात ६८२ कोटी रुपये मिळाले. अन्य राष्ट्रीय व प्रादेशिक पक्षांनाही देणग्या मिळाल्या. विविध पक्षांचे देणगीदार कोण आहेत याचा सविस्तर तपशील अद्याप उघड झालेला नाही.