मुंबई : केंद्रातील मोदी सरकारने आणलेले नवे कृषी कायदे व इंधन दरवाढी विरोधात शेतकरी संघटनांनी उद्या (२६ मार्च) रोजी भारत बंदची हाक दिली आहे. या भारत बंदला काँग्रेस पक्षाचा सक्रीय पाठिंबा असून या बंदमध्ये सहभागी होत काँग्रेस पक्ष राज्यभर उपोषण करणार आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले हे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्यासह इतर नेते व मंत्र्यांसह मंत्रालयासमोरील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत उपोषण करणार आहेत. (Congress supports 'Bharat Bandh'of farmers unions; Many leaders of Congress including Nana Patole will go on hunger strike in Mumbai)
राज्यातील सर्व जिल्हा व तालुक्याच्या ठिकाणीही काँग्रेस नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते या उपोषणात सहभागी होणार आहेत. प्रदेश कार्याध्यक्ष हे विभागाच्या मुख्यालयात उपोषणाला बसणार आहेत. औरंगाबाद येथे शिवाजीराव मोघे, ठाणे येथे माजी मंत्री नसीम खान, नागपूर येथे चंद्रकांत हांडोरे, पुणे येथे बस्वराज पाटील, नाशिकमध्ये प्रणिती शिंदे तर अमरावतीत कुणाल पाटील, हे पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह उपोषणाला बसणार आहेत.
शेतकऱ्यांना उद्धवस्त करणारे काळे कृषी कायदे रद्द करावेत, या मागण्यांसाठी शेतकरी दिल्लीच्या सीमांवर मागील ११० दिवसांपासून ठाण मांडून बसले आहेत. या आंदोलन काळात आतापर्यंत ३०० पेक्षा जास्त शेतकरी शहीद झाले आहेत. परंतु हे कृषी कायदे मोदी सरकारने रद्द केले नाहीत. कृषी कायद्यातील बदलांमुळे रेशनिंग बंद होणार आहे. त्यामुळे गोरगरिब जनता, कामगार वर्गावर उपासमारीची वेळ येणार आहे. मात्र, मनमानी मोदी सरकार याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. तर पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅसवर भरमसाठ कर लावून केंद्र सरकार दरोडा टाकत आहे. पेट्रोल १०० रुपये लिटर तर गॅस सिलिंडर ८५० रुपये झाला आहे. महागाईने लोकांचे जगणे कठीण झाले आहे. कामगार कायद्यांतील बदलांमुळे कामगार देशोधडीला लागणार आहेत. मोदी सरकारच्या या मनमानी व हुकुमशाहीचा विरोध उपोषण करून केला जाणार आहे, असे काँग्रेसने म्हटले आहे.
("पंतप्रधान मोदींवरही आरोप होतात, त्यांनाही राजीनामा द्यायला सांगा आणि चौकशी करा", नाना पटोलेंचा खोचक टोला) अकोला, वाशिम जिल्ह्याची आढावा बैठक..प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली आज गांधी भवन येथे अकोला जिल्हा व शहर काँग्रेस कमिटी तसेच वाशीम जिल्हा काँग्रेस कमिटीची आढावा बैठक घेण्यात आली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत काँग्रेस पक्षाची कामगिरी उज्ज्वल करण्यासाठी पटोले यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. पक्ष संघटना बळकट करण्यासाठी पूर्ण ताकदीने काम करण्याचे आवाहनही पटोले यांनी केली. या बैठकीला प्रदेश कार्याध्यक्ष नसिम खान, कार्याध्यक्ष आ. कुणाल पाटील, उपाध्यक्ष मोहन जोशी, आ. अमित झनक, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, प्रा. सोनावणे, देवानंद पवार आदी उपस्थित होते.