शीलेश शर्मा
नवी दिल्ली : काँग्रेस नेतृत्वाने आता पक्षातील जे नेते पक्ष धोरणाविरोधात जाऊन वक्तव्ये करीत आहेत त्यांच्याविरोधात कठोर भूमिका घ्यायचे ठरविले आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना लस उत्पादक कंपन्यांना भेट दिल्यानंतर केलेल्या ट्वीटनंतर काँग्रेस नेतृत्वाने ही कठोर भूमिका घेतली.
शर्मा यांनी मोदी यांची त्यात प्रशंसाही केली होती. ट्वीटची माहिती होताच काँग्रेस श्रेष्ठींनी १०, जन पथवरून आनंद शर्मा यांना फोन आला व इशारा मिळाला की, जर तुम्हाला वेगळा मार्ग निवडायचा असेल तर निवडावा. पक्षात राहून पक्ष धोरणाविरोधात बोलण्याची परवानगी मिळणार नाही. आनंद शर्मा यांच्यासाठी हा मोठा झटका होता. त्यांनी भूमिका मांडताना पक्षश्रेष्ठींना खात्री दिली की, मी ताबडतोब ट्वीट दुरुस्त करीत आहे. काहीच मिनिटांत शर्मा यांनी दुसरे ट्वीट केले व त्यात मोदी यांच्याऐवजी वैज्ञानिकांची प्रशंसा केली. काँग्रेस नेतृत्वाच्या कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित केलेल्या २३ जणांच्या गटाचे आनंद शर्मा सदस्य होते. या गटाच्या पत्राने खळबळ निर्माण केली होती.
राज्यसभेवर संधी मिळण्याची शक्यता कमीउल्लेखनीय आहे की, आनंद शर्मा यांचा राज्यसभा सदस्यत्वाचा कार्यकाळ एप्रिल २०२२ मध्ये संपत आहे. ते हिमाचल प्रदेशातून २०१६ मध्ये निवडून आले आहेत. आता काँग्रेसकडे शर्मा यांना पुन्हा निवडून पाठवता येईल एवढी सदस्य संख्या नाही. सूत्रांनी सांगितले की, आनंद शर्मा अस्वस्थ होण्याचे हे मोठेे कारण आहे. असेच संकट ग्रुप २३ चे सदस्य गुलामनबी आझाद यांच्यासमोर आहे. त्यांनाही २०२१ नंतर राज्यसभेची जागा मिळेल, असे दिसत नाही.