नवी दिल्ली - मध्य प्रदेशमध्ये सध्या राजकारण तापलं असून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. कमलनाथ सरकारमध्ये मंत्री असलेले काँग्रेसचे आमदार उमंग सिंघार यांनी भाजपाचेज्योतिरादित्य शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ज्योतिरादित्य शिंदे यांनी आपल्याला भाजपामध्ये प्रवेश करण्यासाठी 50 कोटी रुपये आणि मंत्रिपदाची ऑफर दिली होती असं उमंग सिंघार यांनी म्हटलं आहे. सिंघार यांच्या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे.
"ज्योतिरादित्य शिंदे यांनी भाजपामध्ये येण्यासाठी 50 कोटी रुपये आणि मंत्रिपदाची ऑफर दिली होती. आपल्यासाठी तत्व महत्वाची आहेत. पद नाही असं त्यावेळी आपण शिंदेंना आपण सांगितलं" असं सिंघार यांनी म्हटलं आहे. तसेच काँग्रेसमध्ये कोणतेही भविष्य नाही, असं ज्योतिरादित्य शिंदे आपल्याला म्हणाले. तुमच्या आर्थिक परिस्थितीसंदर्भात आम्ही तुमच्यासाठी 50 कोटींची व्यवस्था करू. आपलं भाजपाशी बोलणं झालं आहे. ते तुम्हाला मंत्रीपदही देत आहेत असं ही उमंग सिंघार म्हणाले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
'भाजपामध्ये या, 50 कोटी आणि मंत्रिपदाची ऑफर!'
काँग्रेसने यावरून ज्योतिरादित्य शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांनी या आरोपांना उत्तर द्यावं, असं काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी म्हटलं आहे. उमंग सिंघार हे शिंदे यांचे खास होते. यामुळे ज्योतिरादित्य शिंदे यांनी या आरोपांवर स्पष्टीकरण द्यावं. शिंदे यांनी उमग सिंघार सत्य बोलतं आहेत की खोटं हे स्पष्ट करायला हवं, असं बदनावरमधील सभेत दिग्विजय सिंह यांनी म्हटलं आहे. मध्य प्रदेशात विधानसभेची पोटनिवडणूक होत आहे. सध्या प्रचारात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. याच दरम्यान एका प्रचारसभेत भाजपाच्या ज्योतिरादित्य शिंदे यांनी चक्क काँग्रेसला मतदान करण्याचं आवाहन केलं आहे.
भरसभेत भाजपाचे ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले, "पंजासमोरील बटण दाबून..."; Video तुफान व्हायरल
ज्योतिरादित्य शिंदे यांचा हा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल झाला असून अनेकांनी त्यावरून निशाणा साधला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भाजपा उमेदवाराच्या प्रचारासाठी एका सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेत ज्योतिरादित्य शिंदे यांनी जोरदार भाषण केलं. भाषणाच्या शेवटी त्यांनी लोकांना आवाहन करताना "पंजा समोरील बटण दाबून विजयी..." म्हटलं. पण आपल्याकडून बोलताना चूक झाली हे लक्षात येताच त्यांनी तातडीने ती दुरुस्ती केली. "3 तारखेला भाजपाच्या कमळ चिन्हासमोरील बटण दाबून भाजपाच्या उमेदवाराला विजयी करा" असं म्हणत ज्योतिरादित्य शिंदे यांनी आवाहन करून भाषण आवरलं.