महाविकास आघाडीत पुन्हा कुरघोडी; अशोक चव्हाणांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप
By प्रविण मरगळे | Published: October 31, 2020 11:20 AM2020-10-31T11:20:07+5:302020-10-31T11:22:00+5:30
Congress Ashok Chavan, CM Uddhav Thackeray News: काँग्रेसच्या महानगरपालिकेला पैसे मिळत नाही अशा तक्रारी आल्या, नांदेडलाही पैसे मिळाले नाहीत असं अशोक चव्हाणांनी सांगितले.
मुंबई – शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस या महाविकास आघाडी सरकारमध्ये पुन्हा एकदा कुरघोडी असल्याचं समोर आलं आहे. खुद्द माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी परभणीच्या जाहीर सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. महाविकास आघाडीच्य सरकारमध्ये काँग्रेसच्या महापालिकांना निधी मिळत नाही अशाप्रकारे अशोक चव्हाणांनी तक्रार मांडली. त्यामुळे महाविकास आघाडीतली धुसफूस चव्हाट्यावर आली आहे.
याबाबत मंत्री अशोक चव्हाण म्हणाले की, काँग्रेसच्या महानगरपालिकेला पैसे मिळत नाही अशा तक्रारी आल्या, नांदेडलाही पैसे मिळाले नाहीत, आम्ही मुख्यमंत्र्यांना २-३ वेळा सांगितले, तीन पक्षांचे सरकार आहे, असं असताना आमच्याही महापालिकेला निधी मिळाला पाहिजे. आम्हालाही ताकद मिळाली पाहिजे अशी भावना त्यांनी बोलून दाखवली
तसेच निवडणुकीनंतर भाजपाचं सरकार येऊ नये यासाठी काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा दिला, शिवसेनेची आघाडी करायची की नाही? याबाबत भरपूर चर्चा झाली, सोनिया गांधी आमच्यावर नाराज होत्या. परंतु आमची मते आम्ही पक्षनेतृत्वाकडे मांडली, भाजपाला रोखण्यासाठीच शिवसेनेला पाठिंबा दिला, भाजपाचं सरकार नको, त्यांना सत्तेपासून दूर ठेवले पाहिजे अशी भूमिका पटवून सांगितले, त्यानंतर काँग्रेस सरकारमध्ये आली असंही अशोक चव्हाणांनी सांगितले.
मात्र तिन्ही पक्षांमध्ये चांगल्यापद्धतीने समन्वय आहे, निधीच्या बाबतीत नाराजी आहे त्याचा परिणाम सरकारवर होईल असं बिल्कुल नाही, निधी सगळ्यांनाच हवा आहे. अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात याबाबत अधिक भाष्य करू शकतील अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांनी दिली आहे.
यापूर्वीही अशोक चव्हाणांनी व्यक्त केली होती नाराजी
मंत्री एकनाथ शिंदे यांनी सार्वजनिक बांधकाम उपक्रम विभागास नवीन वेगळा सचिव आणि इतर अधिकारी वर्ग द्यावा अशी मागणी केली. सध्या या दोन्ही विभागासाठी एक सचिव कार्यरत आहे. वेगळा सचिव देण्यास हरकत नाही पण विभागातील सर्व कर्मचारी वर्ग वेगळे करण्यास मंत्री अशोक चव्हाण यांनी आक्षेप घेतला होता. तेव्हाही राज्यात महाविकास आघाडीत नाराजीनाट्य चांगलेच रंगलं होतं. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि मंत्री अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन नाराजीच्या मुद्द्यावर चर्चा केली होती. त्यानंतर थोरातांनी पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडीत कोणताही वाद नाही असं स्पष्ट केलं. त्यानंतर महाजॉब्स पोर्टलच्या निमित्ताने युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी ही योजना महाविकास आघाडीची आहे की राष्ट्रवादी-शिवसेनेची आहे? असा सवाल उपस्थित केला होता. महाविकास आघाडीची स्थापना होताना तिन्ही पक्षांना समसमान वाटप करण्यात येईल असं सांगितले असताना तसं होताना दिसत नाही अशी थेट नाराजी व्यक्त केली. तर ठाण्यात काँग्रेसच्या नेत्यांनी पोस्टर्स लावून काँग्रेसला महाविकास आघाडीत डावलत असल्याचं म्हटलं होतं.