नागपूरमध्ये काँग्रेस-वंचितची आघाडी; ग्राम पंचायतसाठी आले एकत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2021 06:56 PM2021-02-11T18:56:33+5:302021-02-11T19:02:10+5:30
Gram Panchayat Election : दवलामेटी ग्रा.पं.मध्ये वंचित आणि काँग्रेसने एकत्र येत सत्ता स्थापन केल्याने काही महिन्यांनी होणाऱ्या वाडी नगरपरिषदेच्या निवडणुकीवर याचा राजकीय प्रभाव पडेल, असे जाणकारांचे म्हणणे आहे.
नागपूर : नागपूर ग्रामीण तालुक्यात सर्वात मोठी ग्रा.पं.असलेल्या दवलामेटी येथे वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसने सरपंच आणि उपसरपंच पदाच्या निवडणुकीत आघाडी करत भाजपाला झटका दिला.
१७ सदस्यीय असलेल्या या ग्रा.पं.त. सरपंच पदाच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी समर्थीत रिता प्रवीण उमरेडकर यांनी प्रतिस्पर्धी भाजप समर्थीत पॅनेलचे गजानन रामेकार यांचा एका मताने पराभव केला. उमरेडकर यांना ९ तर रामेकार यांना ८ मते मिळाली. उपसरपंचपदाच्या निवडणुकीत काँग्रेस समर्थीत पॅनेलचे प्रशांत केवटे यांनी भाजपाच्या उज्वला भारत गजभिये यांचा पराभव केला. केवटे यांना ९ तर गजभिये यांना ८ मते मिळाली.
दवलामेटी ग्रा.पं.मध्ये वंचित आणि काँग्रेसने एकत्र येत सत्ता स्थापन केल्याने काही महिन्यांनी होणाऱ्या वाडी नगरपरिषदेच्या निवडणुकीवर याचा राजकीय प्रभाव पडेल, असे जाणकारांचे म्हणणे आहे. यापूर्वी दवलामेटी ग्रा.पं.वर भाजपाची सत्ता होती. ग्रा.पं.मध्ये वंचित आणि काँग्रेसला एकत्र आणण्यासाठी काँग्रेस नेते नाना गावंडे तर वंचितचे नेते राजू लोखंडे यांनी महत्त्वाची भूमिका वठविली.