पंजाबमधील पालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसचा बोलबाला, मतदारांनी भाजपाला असा कौल दिला
By बाळकृष्ण परब | Published: February 17, 2021 11:42 AM2021-02-17T11:42:57+5:302021-02-17T11:43:50+5:30
Punjab Local Body Elections Result Live Updates : सध्या दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंजाबमध्ये झालेल्या पालिका निवडणुकांचे निकाल आता येऊ लागले आहेत.
चंदिगड - सध्या दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंजाबमध्ये झालेल्या पालिका निवडणुकांचे निकाल आता येऊ लागले आहेत. शेतकरी आंदोलनाचा प्रभाव या निकालांवर दिसून येत असून, सुरुवातीच्या कलांमध्ये काँग्रेस आणि शिरोमणी अकाली दल या पक्षांनी जोरदार मुसंडी मारली आहे. मात्र शेतकऱ्यांच्या रोषाचे केंद्र ठरलेल्या भाजपाला मोठा धक्का बसला आहे.
पंजाबमधील पालिकांच्या आतापर्यंतच्या मतमोजणीमध्ये काँग्रेस पहिल्या क्रमांकावर आहे. तर शिरोमणी अकाली दल दुसऱ्या स्थानावर आहे. भाजपाला शेतकरी आंदोलनाचा फटका बसला असून, भाजपाची मात्र मोठी घसरण झाल्याचे दिसत आहे. आम आदमी पक्षानेही काही ठिकाणी विजय मिळवण्यात यश मिळवले आहे.
Punjab: Counting of votes underway for local body elections; latest visuals from Ludhiana's Doraha area pic.twitter.com/0hM4JYxMNM
— ANI (@ANI) February 17, 2021
पालिकांचा विचार केल्यास मजिठामध्ये १३ पैकी १० जागांवर अकाली दलाने विजय मिळवला आहे. तरणतारणमधील भिखिविंड नगरपंचायतीमध्ये काँग्रेसने ११ तर अकाली दलाने २ जागांवर विजय मिळवला आहे. राजकोटमध्ये १५ पैकी १५ जागांवर काँग्रेसने बाजी मारली आहे. तर जलालाबादमध्ये १७ पैकी ९ जागांवर काँग्रेस विजयी झाली आहे. त्याचप्रमाणे नंगल, लोहियाँ आणि नूरमहल येथेही काँग्रेसची सत्ता आली आहे. राजपूरामध्ये २७ जागांवर काँग्रेसने विजय मिळवला आहे. मोगामध्येही काँग्रेस मोठा पक्ष ठरला आहे.
अकाली दलासोबतची युती तुटल्यानंतर प्रथमच एकट्याने निवडणूक लढवणाऱ्या भाजपाची या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पीछेहाट झाली आहे. भाजपाला अनेक ठिकाणी पराभव पत्करावा लागला आहे.