मुंबईचा आगामी महापौर काँग्रेसच ठरविणार - भाई जगताप
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2021 05:41 AM2021-02-01T05:41:43+5:302021-02-01T05:44:09+5:30
Mumbai News : एकजुटीने आगामी महापालिका निवडणुकीत काँग्रेसला पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनवायचा आहे. एकतर आमचा महापौर बसेल किंवा आमच्या मर्जीचा महापौरच महापालिकेच्या खुर्चीत बसेल. त्याशिवाय दुसरे चित्र नसेल, असे जगताप यावेळी म्हणाले.
मुंबई : काँग्रेस मोठा परिवार आहे. त्यामुळे भांड्याला भांड लागणे स्वाभाविक होते. पण, मागच्या काळात अंतर्गत मतभेद आता बाजूला सारत सर्वजण एकत्र येत आहोत. एखाद्या मतदारसंघात अजून काही अडचणी असल्या तरी त्यावर आमच्याकडे तोडगा आहे.
एकजुटीने आगामी महापालिका निवडणुकीत काँग्रेसला पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनवायचा आहे. एकतर आमचा महापौर बसेल किंवा आमच्या मर्जीचा महापौरच महापालिकेच्या खुर्चीत बसेल. त्याशिवाय दुसरे चित्र नसेल, असे जगताप यावेळी म्हणाले.
विभागीय काँग्रेसमधील नेतृत्व बदलानंतर अध्यक्ष भाई जगताप आणि कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा यांनी जाहीर केलेल्या शंभर दिवसांच्या संपर्क अभियानाचा पहिला टप्पा रविवारी पार पडला. रविवारी दक्षिण मुंबई आणि उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्ता मेळाव्यांनी सर्व सहा लोकसभा मतदारसंघातील मेळावे पार पडले. विशेष, म्हणजे अंतर्गत मतभेद बाजूला सारत गटांच्या नेत्यांनी आपापल्या भागातील मेळाव्यांना हजेरी लावली.
रविवारी, सकाळी दक्षिण मुंबईतील कार्यक्रमास जगताप आणि सप्रा यांच्यासह माजी मंत्री मिलिंद देवरा, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, एकनाथ गायकवाड, आमदार अमीन पटेल आदी नेते उपस्थित होते. तर, सायंकाळी उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील कार्यक्रमास संजय निरूपम, सुरेश शेट्टी आदी नेत्यांनी उपस्थिती लावली.
आगामी काळात इंधन दरवाढीविरोधात मुंबईत मोठे आंदोलन उभारणार असल्याचा इशाराही जगताप यांनी दिला. येत्या काळात स्थानिक समित्यांवरील नियुक्त्या करताना मुंबई काँग्रेसमध्ये चर्चा केल्याशिवाय निर्णय होणार नाहीत, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. मुंबईत काँग्रेस आमदारांची संख्या दोन आकडी झाली की राज्यात आणि सहा खासदार निवडून आले तेंव्हा केंद्रात काँग्रेसची सत्ता येते. ही सत्ता पुन्हा आणायची असेल तर महापालिकेची लढाईची तयारी आतापासुन सुरू करावी लागेल, असे जगताप म्हणाले.
पदयात्रा सुरु करणार
आगामी काळात मुंबईतील सर्व जिल्ह्यांमधून पदयात्रांना सुरुवात करणार असल्याचे चरणसिंग सप्रा यांनी सांगितले. जनतेचे प्रश्न समजून घेऊन त्या प्रश्नांमध्ये हात घातला पाहिजे. त्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करायला हवा. काँग्रेसची विचारधारा लोकांना पटवून द्यायला हवी, असे सप्रा म्हणाले.