राष्ट्रवादीवर अंकुश ठेवण्यासाठी काँग्रेसचं नाराजी नाट्य; अजित पवारांचा फोन जाताच उपोषण रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2020 02:41 AM2020-08-26T02:41:05+5:302020-08-26T06:48:47+5:30
अनेक ठिकाणी निधी वाटप करत असताना ज्या ठिकाणी शिवसेना आणि राष्ट्रवादीचे सदस्य जास्त आहेत, त्यांना झुकते माप दिले गेले. यामुळे काँग्रेसमध्ये अस्वस्थता होती.
अतुल कुलकर्णी
मुंबई : काँग्रेस आमदारांच्या कार्यक्षेत्रातील नगरपालिकांना निधी देण्यात राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप करीत, काँग्रेसच्या ११ आमदारांनी उपोषणाचे अस्त्र उपसले होते. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फोन करताच आ. कैलास गोरंट्याल यांनी आपले उपोषण मागे घेतले.
विकास निधीच्या माध्यमातून काँग्रेस दबाव गट निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे. जर राष्ट्रवादीकडून अशा पद्धतीने काँग्रेसच्या आमदारांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न केले जाऊ लागले तर, हा दबाव गट कामाला येईल, असा प्रयत्न यामागे असल्याचे एका ज्येष्ठ नेत्याने स्पष्ट केले. विविध मतदारसंघात विकास कामे करण्यासाठी २५/१५ या नियमाखाली निधी दिला जातो. या निधीचे वाटप करताना राष्ट्रवादीच्या आमदारांना झुकते माप देण्यात आले. नगर विकास विभागाकडून देण्यात येणाऱ्या निधीमध्ये देखील शिवसेनेच्या आमदारांना झुकते माप दिले गेले. काँग्रेसचे आमदार ज्या मतदारसंघात आहेत तिथल्या नगरपालिकांना पुरेसा निधी मिळाला नाही.
अनेक ठिकाणी निधी वाटप करत असताना ज्या ठिकाणी शिवसेना आणि राष्ट्रवादीचे सदस्य जास्त आहेत, त्यांना झुकते माप दिले गेले. यामुळे काँग्रेसमध्ये अस्वस्थता होती. हा विषय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कानावर घातला होता. थोरात म्हणाले, ठाकरे आणि अजित पवार दोघांशीही बोललो आहे.
मधल्या काळात काही निधी कमी दिला गेला, पण पुरवणी मागण्यांमध्ये सगळ््यांना व्यवस्थित निधी दिला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. आमदारांची नाराजी असणे समजू शकतो, कारण प्रत्येकाला आपल्या मतदारसंघासाठी विकास कामांकरता निधीला पाहिजे असतो. मात्र लगेच सरकारवर संकट आले, असा त्याचा अर्थ काढणे योग्य नाही, असेही थोरात यांनी स्पष्ट केले.
उर्वरित दहा आमदार कोण आहेत असे विचारले असता आमदार गोरंट्याल म्हणाले, त्यांची नावे घेणे योग्य नाही. दरम्यान शिवसेनेच्या मुखपत्रात या अनुषंगाने खासदार निधी गोठण्याचा मुद्दा पुढे आणण्यात आला आहे. काँग्रेसचे आमदार उपोषण करत आहेत, लोकशाही वगैरे मान्य आहे, मात्र ज्यांनी सरकार स्थापन करण्यास परवानगी दिली त्या सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यावर अविश्वास व्यक्त केल्यासारखे होईल, असा नाराजीचा सूरही लावला आहे.
नाईलाजाने उपोषणाचा मार्ग निवडला
आ. कैलास गोरंट्याल म्हणाले, माझ्या मतदारसंघात नगरपालिकेसाठी नगर विकास विभागाने निधी दिला नाही. माझ्यासोबत आणखी दहा आमदार असे आहेत, ज्यांना निधी मिळाला नाही. त्यामुळेच आम्ही नाईलाजाने उपोषणाचा मार्ग स्वीकारला होता. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वत: आपल्याला फोन केला आणि निधी देतो, पुरवणी मागण्यांत व्यवस्था करतो, असे सांगितले. आम्ही उपोषण करणार नाही, असेही ते म्हणाले.