अर्णब गोस्वामींविरोधात काँग्रेसचा मोठा निर्णय; प्रत्येक पोलीस ठाण्यात देशद्रोहाचा गुन्हा नोंदवणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2021 12:20 PM2021-01-24T12:20:18+5:302021-01-24T12:21:13+5:30
Congress Bhai jagtap Against Arnab Goswami : भारतीय लष्कराच्या कारवाईबाबतची संवेदनशील माहिती अर्णब गोस्वामी यांच्याकडे तीन दिवस आधीच कशी पोहचली? अर्णब आणि पार्थोदास गुप्तासोबत केलेल्या संवादातून बालाकोटच्या लष्करी कारवाई तसेच पुलवामाच्या दहशतवादी हल्ल्याबाबतचादेखील संवाद झाल्याचे समोर आले आहे.
मुंबई : भारतीय लष्कराच्या कारवाईबाबतची संवेदनशील माहिती अर्णब गोस्वामी यांच्याकडे तीन दिवस आधीच कशी पोहचली? अर्णब आणि पार्थोदास गुप्तासोबत केलेल्या संवादातून बालाकोटच्या लष्करी कारवाई तसेच पुलवामाच्या दहशतवादी हल्ल्याबाबतचादेखील संवाद झाल्याचे समोर आले आहे. याविरोधात केंद्र सरकारने काहीच पाऊले न उचलल्याने कांग्रेसने आता मोठा निर्णय घेतला आहे.
मुंबईतील काँग्रेस कार्यकर्ते, नेते मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणार आहेत. तसेच अर्णब यांच्या अटकेची मागणी करणार आहेत. मुंबई काँग्रेसचे नवनियुक्त अध्यक्ष भाई जगताप यांनी शनिवारी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत ही घोषणा केली आहे.
जगताप यांनी सांगितले की, अर्णब गोस्वामी हे मुंबई पोलिसांपासून वाचण्यासाठी दिल्लीमध्ये बस्तान हलविले आहे. जर मुंबईच्या प्रत्येक पोलीस ठाण्यात देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला तर मुंबई पोलिसांवर त्यांना दिल्लीतून अटक करून आणण्यासाठी दबाव वाढेल. सोमवारपासून गोस्वामी यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यास सुरुवात करण्यात येणार आहे. मी आणि कार्याध्यक्ष चरणजीत सिंह सप्रा सोमवारी आझाद मैदान पोलीस ठाण्यात गोस्वामींविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणार आहोत.
मुंबईत एकट्याने लढणार...
जगताप यांनी मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढणार असल्याची पुन्हा घोषणा केली. यासाठी माझी मुंबई, माझी काँग्रेस मोहिम सुरु केली जाणार आहे. 100 दिवसांची ही मोहिम असणार आहे. मुंबईतील प्रत्येक जिल्ह्यात महिन्याला 1 दिवस जनता दरबार भरविला जाईल. याला काँग्रेसचे सर्व मंत्री हजर असतील आणि लोकांचे प्रश्न सोडवतील, असे ते म्हणाले.
‘सर्जिकल स्ट्राइक’बाबतही होती माहिती
जम्मु काश्मिरच्या पुलवामामध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी अत्यंत गोपनीय पध्दतीने केंद्र सरकार व भारताच्या संरक्षण मंत्रालयाकडून लष्करी कारवाईची (बालाकोट सर्जिकल स्ट्राइक) माहिती थेट रिपब्लिक टीव्ही’चे अर्णव गोस्वामी यांच्यापर्यंत कशी पोहचली आणि त्यांनी याबाबत ‘बार्क’चे माजी सीईओ पार्थाे दासगुप्ता यांच्याशी याबाबत संवाद साधत माहितीची देवाणघेवाण केल्याचेही पुढे आले आहे. एकुणच ‘टीआरपी’ घोटाळ्याच्या तपास आता वेगळ्या वळणावर येऊन पोहचला आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाकडून या संपुर्ण घोटाळ्याची चौकशी सुरु आहे.